चौंडकं
राजन गवस
नमस्कार मित्रहो आज रविवार परत एक नवीन
पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे. एक अशा लेखकाचे पुस्तक ज्याच्या प्रत्येक
पुस्तकास विविध पुरस्कार मिळालेले आहेत,कोल्हापुर शिवाजी विद्यापीठातुन एम.ए.,एम एड पर्यंत शिक्षण पूर्ण केले.भोवतालच्या परिस्थितीचे निरीक्षण
करून ते प्रभावीरीत्या लोकांसमोर मांडणे हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य मानले
जाते.त्याच प्रभावी आणि समाज्याच्या अशा एका घटकावर त्यांनी या कादंबरी मधुन
प्रभावीपणे प्रकाश टाकला आहे. या कादंबरीला १९८५चा उत्कृष्ट
वाड्मय निर्मितीचा राज्य पुरस्कार,१९८५चा श्याम पानघंटी पुरस्कार-पुणे,Dr.अरुण लिमये ट्रस्ट,पुरस्कार-पुणे अश्या प्रकारचे पुरस्कार या कादंबरीला
मिळाले आहेत.अशी ही कादंबरी म्हणजे राजन गवस लिखित चौंडकं.
चौंडकं हे
एक के वाद्य आहे जे देवदासी लोक वापरतात म्हणजे कोल्हापुर,कर्नाटक
पासुन अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेथे जेथे जोगती-जोगतीणी लोक आहेत ते देवीचा जागर करताना हे वाजवतात. चौंडकं हे एक दुर्मीळ आणि पौराणिक वाद्य आहे, फार पूर्वी भगवान परशुरामाने
बैट्यासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्या राक्षसाच्या शरीराच्या काही भागां
पासुन भगवान परशुरामाने चौंडकं हे वाद्य
बनवले.आणि स्वतः भगवान परशुरामाने पहिल्यांदा ते वाजवले. मग पुढे कालांतराने ते
वाद्य लाकडाचे बनवण्यात आले आणि आज ही ते
बनवलं जात आणि वाजवलं ही जात. हे वाध्य वाजविण्यास अत्यंत अवघड. एका हाताच्या आणि
बोटांच्या साहाय्याने हे वाजविले जाते. चौंडकं या वाद्यांची
माहिती मला भुयेवाडी चे श्री तानाजी बडेकर यांनी दिली ती हि फक्त एका message
वर.मना मध्ये कोणताही किंतु-परंतु न ठेवता. त्या बद्दल त्यांचे खूप
खूप आभार.
आता थोडं या कादंबरी विषयी बोलुया,कादंबरी १६२ पानांची आहे, कादंबरीच्या मुखपृष्ठावर एका देवदासीचं
चित्र आहे. ती देवदासी डोक्यावर देवीचा जग (जग म्हणजे एका मोठ्या टोपलीच्या मध्ये
देवीची मोठी मूर्ती असती त्याच्या मागे मोरपिसांचे वर्तुळाकार मखर असते. देवीच्या
मूर्तीला शालु नेसवलेला असतो टोपलीच्या काटावर छोट्या छोट्या विविध देवींच्या
छोट्या छोट्या मूर्त्या असतात.) डोक्यावर घेऊन उभी आहे त्या देवदासीने कपाळाला
भंडारा लावला आहे,गळ्यामध्ये कवड्याची माळ आहे.
अंगामध्ये हिरवा शालु नेसलेला आहे. अशी ही देवदासी बघताच डोळ्यात भरते आणि
मुखपृष्ठावरूनच कादंबरीचा विषय समजतो.
कादंबरी मधील कथा साधारण १९८०-८५ च्या
काळामधील आहे.(म्हणजे ही कादंबरी तेव्हाचीच आहे.) त्या वेळची समाजामधील अंधश्रद्धा
म्हणजे एक असाध्य रोगच त्या रोगावर किती ही उपचार केला
तरी तो न बरा होण्यासारखाच आणि अजून सुद्धा तो रोग आपल्या समाजात
आहे. त्या काळी अगदी साधा आजार झाला तरी देवीचा भंडारा खा,देवी ची ओटी भरा हे आणि किती तरी उपाय
वेड्या अंधश्रध्ये पोटी लोकांना करण्यास भाग पाडलं जायचं. अश्याच अंधश्रद्धेला बळी
पडलेल्या छोट्या सुली ची कथा या कादंबरी मध्ये लेखकाने मांडली आहे. तिच्या हिंडण्या-खेळण्याच्या दिवसातच तिच्या कोवळ्या मनाचा विचार न
करता तिला देवाला सोडल जात आणि तिथुन तिच्या आयुष्याची फरफट सुरु होते. ज्या कोवळ्या वया मध्ये तिने भातुकलीने खेळावे,मैत्रीणीन सोबत हिंडावं फिरावं त्याच
कोवळ्या वयात तिला दारो-दारी जाऊन भिक्षा मागायला भाग पडलं जातं. देवदासी म्हणजे
जोगतीण देवाची आणि मालकी गावाची हे वाक्य देवदासीं बद्दल म्हंटले जाते. सुलीच्या (देवदासी स्रियांच्या) आयुष्याची झालेली फरफट लेखक राजन गवस
यांनी अगदी प्रभावीपणे या कादंबरी मध्ये मांडली आहे. कादंबरी वाचते वेळी असं वाटतं
की आपण लेखकाचे बोट पकडून देवदासींचे खडतर जीवन जवळून पाहतो असा भास होतो.
कादंबरीची भाषा आमच्या पश्चिम महाराष्ट्राकडची
आहे आणि कादंबरी मध्ये उपमा अलंकार पद्धती मध्ये भरपुर वाक्य आहेत(काळीज केळी च्या पानागत फाटत गेल,
उन्हा अंबिली गत पिवळी पडली होती) ते वाचते वेळी समजते कि लेखकाचे सभोवतालच्या
परिसराविषयी किंवा सभोवतालच्या घटना,वस्तू,परिस्तिथी विषयीचे वर्णन करण्याची एक
वेगळीच दृष्टी लेखकाकडे आहे . लेखक राजन गावास आपल्या प्रत्येक
कादंबरीतुन समाजातील प्रत्येक घटकांवर एक वेगळाच प्रकाश टाकतात. त्यातुन
वाचणाऱ्याच्या मनात त्या घटकांविषयी सहानुभुती आणि आदर या दोन्ही भावना निर्माण
होतात आणि त्यांचे विचार बदलुन टाकतात.
सहानुभुतीची दृष्टी असणाऱ्या आणि
समाजातील वंचित घटकांविषयी वेगळ्या पद्धतीने जाणुन घेणाऱ्या आणि प्रत्येक वाचकाने
जरूर वाचावी अशी कादंबरी लेखक
राजन गवस लिखित चौंडकं.
- श्रीजीवन तोंदले