Showing posts with label ललित लेख. Show all posts
Showing posts with label ललित लेख. Show all posts

Sunday, March 31, 2024

अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या समाजाचे डोळे खाड्कन उघडणारे पुस्तक

 



संभ्रम

                                                   लेखक - अनिल अवचट

 

 

असं म्हणता कि "जिथं विज्ञान संपत तिथून अध्यात्म सुरु होतं..... " पण हेच अध्यात्म जास्त झालं तर त्याचं रूपांतर व्यसनात होतं. या अध्यात्माच्या वल्गना करत, त्याचे महत्व अति रंजकपणे मांडून काही लोकं मोठी होतात. लोकांना उपदेश करू लागतात. आपला भारत देश हा व्यक्ती पूजक देश आहे. एखाद्या व्यक्तीला इथे डोक्यावर घ्यायचं म्हंटलं कि समाजातील प्रत्येक स्थरातील लोक एकत्र येतात, त्याच्या नावाच्या अति रंजक कथा रचून त्या व्यक्तीच व्यक्ती महत्व वाढवतात. मग त्या व्यक्तीला देवपण जरी मिळालं तरी चालेल. एक वेळ देव कमी पडतील पण या व्यक्तीचे महात्मे खूप दूरवर पोहचते. ते साधेसुदे मनुष्य न राहता ते गुरु म्हणून प्रसिद्धीला येतात. मग त्या गुरूंचे पुढे काय काय होते हे जास्त खोलात जाऊन सांगायची गरज नाही..... याच विषयावर थोडं पुढं जाऊन लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचं काम हे पुस्तक करत. मंडळी मी बोलत आहे, पत्रकार,लेखक अनिल अवचट लिखित 'संभ्रम' या पुस्तकाबद्धल.

१६८ पानांचे, समाजाचे डोळे खाड्कन उघडणाऱ्या या पुस्तकामध्ये एकूण १२ लेख आहेत. हे सर्व लेख बुवाबाजी, अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती या आपल्या भारतीय समाजाला लागलेल्या रोगा विषयी भाष्य करतात. यासर्व १२ लेखांची मांडणी तीन प्रकरणांमध्ये केली आहे. ज्यामुळे या पुस्तकाचा संपूर्ण विषय आणि त्याचे विशलेषण सोप्या पद्धतीने होते .

प्रकरण क्र. १ अंधश्रद्धेचे गुरु. या प्रकरणामध्ये एकूण ४ लेख आहेत. ज्यामध्ये रजनीश, न्यायरत्न विनोद, सदानंद महाराज या बाबा लोकांचे त्यांच्या भक्तांवर असणाऱ्या प्रभावावर भाष्य केले आहे. या प्रकरणांच्या माध्यमातून लेखकाने या बाबा लोकांच्या रोजच्या भरणाऱ्या दरबाराविषयी, त्यांच्या उच्च राहणीमाना विषयी, ते अचानक कसे प्रकटले हे त्यांच्या भक्तांद्वारे रचलेल्या भाकड कथांविषयी आणि तिथे चालणाऱ्या गोष्टींविषयी भाष्य केले आहे. या प्रकरणाचे विश्लेषण करतेवेळी मला नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या How to become a Cult Leader या डॉक्युमेंटरी सिरीज ची आठवण येते. या  Cult Leader म्हणजेच हे बाबा, गुरु, स्वामीजी वगैरे वगैरे.... या leaders च्या प्रभावाखाली त्याचे अनुयायी इतके वाहत जातात की त्याच्या आज्ञेचे अनुपालन करण्यासाठी ते काहीही करू शकतात. त्या बदल्यात या अनुयायी मंडळींना स्वर्गप्राप्ती, मोक्ष या सारखे बक्षिसे हे बाबा लोक देतात. पण लोकांनी आपल्या सद्सद विवेक बुद्धीचा वापर केला तर ते या बाबा लोकांपासून दूर राहून आपले सुखी आयुष्य जास्त सुखकरपणे जगू शकतात.

प्रकरण क्र. २ अंधश्रद्धांचे केंद्र. या प्रकरणामध्ये एकूण ५ लेख आहेत. काळूबाईची जत्रा,समर्थांच्या पादुका,साईबाबांची शिर्डी,मीरा दातारचा दर्गा, वारकऱ्यांचे अधिवेशन. या लेखांच्या माध्यमातून लेखकाने या ठिकाणच्या घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर भाष्य केले आहे. अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असतात, मग ते व्यक्ती असोत वा  एखादे स्थळ. लोकांचा एक गोड गैरसमज असतो कि त्याच ठराविक ठिकाणी जाऊन देवाची पूजा केली तर देव प्रसन्न होतो. मग तो देव उंच शिखरावर असू व समुद्राच्या तळाशी. पण याठिकाणी होणारे कारभार आपण उघड्या डोळ्यांनी पाहिले तर आपल्याला लगेच समजून येईल की देव देवळात नसून तो माणसात आहे. अंधश्रद्धांच्या या प्रत्येक केंद्रावर होणाऱ्या प्रत्येक घडामोडींचे विश्लेषण लेखकाने या प्रकरणाच्या माध्यमातून केले आहे.

प्रकरण क्र. ३ अंधश्रद्धांचे बळी. या प्रकरणामध्ये एकूण ३ लेख आहेत. पुष्पमालेची दीक्षा, देवदासी एक, देवदासी दोन. आपल्या समाज्याच्या प्रत्येक स्थरावर, प्रत्येक जातीमध्ये आपल्याला अंधश्रद्धांचे बळी सापडतात. शिकलीसवरली लोकं सुद्धा याचे बळी ठरले आहेत. जैन सामाज्यामध्ये अल्पवयीन मुलींना संन्यासीदीक्षा दिली जाते. डोक्यात जट निघाली, कुटुंबावर वाईट वेळ आली, काही तरी अनिष्ट झाले तर त्याचे प्रायश्चित म्हणून घरातील अल्पवयीन मुलींना यल्लमास सोडले जाते. यासर्व अंधश्रद्धांचे बळी ठरलेल्या गोष्टींचा लेखकाने या प्रकरणातून वेध घेतला आहे.

अंधश्रद्धेमुळे होणारी हानी लक्षात घेता त्यातून शक्य तितक्या लवकर मुक्त होणं गरजेचं आहे. मुक्त होण्यासाठी खुप काही कष्ट लागणार नाहीत. गरज आहे ती फक्त बुद्धी तर्क आणि विवेक वापरून प्रत्येक गोष्टीची सत्यासत्यता आणि विश्वासार्हता तपासून बघण्याची. प्रत्येक घटनेची वैज्ञानिक दृष्टिकोनातून चिकित्सा करुन बघितल्यास त्यामागील विज्ञान आणि कार्यकारणभाव समजून घेता येतो. वर्षा होणे किंवा वीज कडाडणे ह्यामागील वैज्ञानिक कारण जोपर्यंत ज्ञात नव्हतं तोवर त्यामागे कुणीतरी देवी देवता आहेत अशी लोकांची समजूत होती. परंतु आता विज्ञानाने पाऊस पडणे, विजांचा कडकडाट होणे, भूकंप ज्वालामुखी, वादळ इत्यादी नैसर्गिक घटनांमागे काय विज्ञान आहे हे शोधून काढलं. तेव्हापासून सर्वसाधारण माणसांनाही ते विज्ञान कळायला लागलं. सत्य कळताच गैरसमजूती आपसूकच गळून पडतात. देवीचा कोप म्हणून समजले जाणाऱ्या काही आजारांची काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या मनावर जबरदस्त दहशत होती. पण विज्ञानाने त्या आजारांची कारणे शोधून काढलीत. उपचार शोधून काढलेत. आणि त्या आजारांचं निर्मूलन करण्यासाठी लस तयार केली तेव्हापासून ते आजार समूळ नष्ट झालेत. त्यामुळे आता आपल्याला त्या आजारांची भीतीही वाटत नाही. त्याप्रमाणेच आपण जर प्रत्येक घटनेची विज्ञान आणि विवेकाच्या कसोटीवर तपासणी करु शकलो तर प्रत्येक अंधश्रद्धेतून आणि भयातून मुक्त होणं शक्य होईल.

पुस्तकाच्या प्रकाशन केले आहे, मॅजेस्टिक पब्लिकेशन हाऊस यांनी. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि पुस्तकातील चित्रे सुभाष अवचट यांनी केली आहेत.या पुस्तकाविषयी बोलण्यासारखे खूप आहे. पण सध्याचे वातावरण बघता, कधी कोणाची, कोणत्या गोष्टी मुळे भावना दुखावली जाईल हे सांगता येत नाही. ज्याने अंधश्रद्धेच्या गर्देत अडकलेल्या लोकांचे डोळे उघडतील. प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे आणि प्रत्येक वाचकाने, प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, अनिल अवचट लिखित

संभ्रम !

Sunday, January 29, 2023

स्तानिस्लावस्कीची रंगमंचकला ही अजरामर मार्गदर्शनदीपिका.....

 


रंगमंचकला

                                               

                                                     लेखक - स्तानिस्लावस्की

 

                                 मराठी अनुवाद - ओंकार गोवर्धन.

 

कोंस्टेंटिन स्तानिस्लावस्की यांचे मूळ नाव Alexeyev. अतिशय श्रीमंत घरातील त्यांचा जन्म. त्यांचे वडील मोठे उद्योगपती होते. Alexeyev चे बालपण अतिशय सुखात गेले. सुरुवाती पासूनच त्यांना कलेची जास्त ओढ होती. हे पाहता १८७७ आणि १८८१ मध्ये त्यांचा वडलांनी त्यांना थिएटर बांधून दिले. नट आणि दिग्दर्शक म्हणून स्तानिस्लावस्की यांची सुरुवात याच रंगमंचावर झाली. पुढे व्यावसायिक नट बनून काम करणे हे त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक दर्जाला तडा देणारे होतं, म्हणून आपल्या घरच्यांपासून लपवून त्यांनी स्वतःचे कोंस्टेंटिन स्तानिस्लावस्की हे नाव लावले, १८८४ साली कोंस्टेंटिन स्तानिस्लावस्की हे त्यांचे रंगमंचीय नाव झाले. जगभरातल्या प्रत्येक रंगकर्मींसाठी स्तानिस्लावस्की हे एक आदरणीय नाव. अभिनयाविषयीचे मूलभूत कार्यपद्धतीचे चिंतन त्यांनी केले. त्या पद्धती त्यांनी अभिनयव्यहारात लागू केल्या. स्तानिस्लावस्की यांच्यावर पात्र जगणं या गोष्टीचा मोठा प्रभाव होता. पात्र जगणं या क्षमतेला आजमावण्यासाठी ते कधी कधी वेगवेळ्या पात्रांचा वेश करून वावरत असत. रंगमंचीय क्षेत्रात स्तानिस्लावस्की यांनी अनेक सिद्धांत मांडले. त्यासोबत काही नीतिनियमांचा स्तानिस्लाव्हाकी  यांनी नाट्य व्यवहारात कायमच पाठपुरावा केला. स्तानिस्लावस्की म्हणतात अभिनय ही केवळ रंगमंचावर सादर करण्याची कला नसून स्वेच्छेने निवडलेले जीवितकार्य होय. रंगमंचावरील सहजसुलभ वावर, प्रभावी शब्दफेक, अर्थपूर्ण विराम यांविषयी केलेले मार्गदर्शन म्हणजे रंगमंचकला.

नमस्कार मंडळी, मी आज तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे, स्तानिस्लावस्की यांनी शब्दध केलले रंगमंचकला  (The Art Of The Stage) हे पुस्तक. या पुस्तकाचा सुंदर मराठी अनुवाद केला आहे अभिनेते ओंकार गोवर्धन यांनी. हे पुस्तक नाट्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असे आहे. १९५ पानांच्या या पुस्तकाच्या माध्यमातून स्तानिस्लावस्की आपल्याला नाट्यव्यवहारातील नीतिनियमांविषयी सांगतात.सुमारे ३१ प्रकरणांच्या माध्यमातून प्रत्येक कलाकाराने नाट्य क्षेत्रामध्ये आपली वर्तवणूक कशी ठेवली पाहिजे हे साध्या आणि सोप्या शब्दात सांगतात. स्टुडिओ १,,३ या प्रकरणांमधून (स्टुडिओ म्हणजे नट जेथे नाटकाची रोज तालीम करतो, नटांना जिथे प्रशिक्षित केले जाते ती जागा) स्टुडिओ मध्ये कशा प्रकारचे वातावरण असावे आणि नको असलेल्या पद्धतीचा व्यवहार नटाने आणि शिक्षकाने कसा टाळावा यावर सुद्धा ते भाष्य करतात.नटाने रंगमंचावर वावरतेवेळी एकाग्रता, हावभाव, संवाद यावर कसे काम करावे या आणि अशा कितीतरी पद्धती ज्या नटांसाठी उपयुक्त आहेत त्यासर्वांची माहिती आपल्याला या पुस्तकामध्ये मिळते.

स्वतः नाट्यक्षेत्रामध्ये काम करते वेळी मला या पुस्तकाचा आणि यामधील प्रत्येक गोष्टींचा खूप फायदा झाला. स्तानिस्लावस्की यांनी नटाचा  व्यवहार त्याचे आचरण, नाट्यगृह बाहेर त्याने कसे वागले पाहिजे यासंदर्भात सुद्धा ते काही घटनांचे संधर्भ देऊन सांगतात. प्रयोगाच्या आधी नटाने स्वतःची तयारी कशी करावे हे सांगते वेळी त्यांनी काही प्रसिद्ध नटांचे उदाहरण सुद्धा दिले आहे, ज्याचा उपयोग प्रत्येक कलाकाराला होईल यात शंका नाही. स्तानिस्लावस्कीची ही अजरामर मार्गदर्शनदीपिका अभिनेते ओंकार गोवर्धन यांनी मराठीमध्ये आणली त्याबद्दल त्यांचे खूप खूप कौतुक आणि आभार.पुस्तकाच्या मनोगतामध्ये  ते सांगतात की त्यांच्या कारकिर्दीच्या टप्प्यावर त्यांची स्तानिस्लावस्किनशी ओळख झाली. माझ्या बाबतीत सुद्धा मी हेच म्हणेन कारण कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मला हे पुस्तक मिळाले ज्यामुळे मला माझा प्रवास सुखद वाटतो.

आता सरतेशेवटी या पुस्तका संदर्भात एक प्रश्न उरतो की या पुस्तकाचा वाचक वर्ग कोणता ? तर या प्रश्नाचे उत्तर अभिनेता ओंकार गोवर्धन यांनी त्यांच्या मनोगतामधून दिले आहे. पुस्तकाचे प्रकाशन राजहंस प्रकाशन यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ सुनीत वडके यांनी केले आहे. प्रत्येक नाट्य कलाकाराने वाचावे, प्रत्येक कलाकाराच्या संग्रही असावे आणि प्रत्येक वाचकाने जरूर वाचावे असे हे पुस्तक रंगमंचकला.

Sunday, May 1, 2022

मायानगरी मुंबईमधील रात्रीचा दिवस करणाऱ्या जगाचे शब्दचित्रं....

 



लेट नाईट मुंबई

                          लेखक - प्रवीण धोपट

 

 मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असणारे हे  महाशहर. या महाशहराने आजवर खूप लोकांना आपल्यामध्ये सामावून घेतलं. प्रत्येक जण या शहराकडे आकर्षित झाला. प्रत्येक जण या शहरात येतो ती काही स्वप्ने घेऊन, काही तरी मोठा करायची स्वप्नं, स्वतःला सिद्ध करायची स्वप्नं, या शहरामध्ये छोटंसं का असेना पण आपल्या स्वतःचे घर असावे हे तर मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न असते. म्हणून तर या मुंबईला स्वप्ननगरी म्हंटल जातं. या मायानगरीने आजवर खूप घाव सोसले,चांगल्या वाईट आठवणी स्वतःमध्ये साठवून घेतल्या. तरी सुद्धा हे शहर आपल्या जागी घट्ट पायरोवुन उभे आहे. पहाटेच्या ४:३० च्या पहिल्या लोकल ने मुंबईच्या दिवसाची सुरवात होते. गतिमान असलेल्या या शहराला थांबायची सवय नाही. ही  मायानगरी दिवसभर घड्याळाच्या काटयावर धावत जरी असली तरी दिवस मावळल्यावर, दिवसाचा पालनहार सूर्य समुद्राच्या गर्भामध्ये विलीन होतो तेव्हा हे शहर रात्रीच्या मिठीत सामावून जाते. या शहराच्या रात्रीचे वर्णन लेखक प्रवीण धोपट यांनी त्याच्या  लेट नाईट मुंबई या पुस्तकामध्ये केले आहे. 

 १६६ पानांच्या या पुस्तकामधून  ३१ प्रकारणांद्वारे लेखकाने  मायानगरी मुंबईची रात्र कशी असते याचे शब्दचित्रित वर्णन केले आहे. रात्रीच्या शांतते त्यासर्वांची एक लयबद्ध हालचाल सुरु असते ती संपूर्ण रात्र जागून आपलं काम पूर्ण करण्यासाठी.रात्रीच्या या विश्वामध्ये रिक्षा-टॅक्सीवाल्याने पासून ते सायकल चहावाले, कॉल सेन्टरचे कर्मचारी, वेश्या, कारखान्यातील, मेट्रो चे कामगार हे आणि कितीतरी लोक ज्यांची रात्री सकाळ होते ते बाहेर पडतात. यासोबतच पार्वतीचे बाळ जन्माला येत आहे या  प्रकरणातून गणेश मूर्ती घडविणाऱ्या कामगारांची आणि गणेश उत्सवाची सुरुवात ते मुंबईची शान असणाऱ्या गिरगाव चौपाटी वरील रात्रीचे दृश्य आणि त्यासोबतच गणपती विसर्जनाच्या वर्णनापर्यंत सर्वगोष्टी वाचते वेळी नजरेसमोर उभ्या रहातात. पुस्तकांमधील प्रत्येक प्रकरणाविषयी बोलावे तितके कमीच आहे. कारण वाचक जर मुंबई शहराच्या बाहेरचा असले तर त्याला यासर्व गोष्टीची त्या सर्व परिसराची अपृवई वाटेल, तो प्रत्येक परिसर वाचकाला त्याच्याकडे आकर्षित करेल आणि  जर वाचक  मुंबईचा असेल तर त्याला त्या परिसरामध्ये रात्री एक फेरफटका मारावा याचा मोह होईल. कारण लेखकाने खूप प्रभावीपणे मुंबई शहरातल्या रात्रींचे शब्दचित्रण केले आहे. प्रत्येक शहराची स्वतःची अशी वेगळी ओळख असते. आणि मुंबई हे महाशहर त्याच्या प्रत्येक गोष्टीची वेगळी आणि अनोखी ओळख ठेवून आहे. दिवसा धावणारे हे शहर रात्री मात्र शांत त्याच्या धुंदीमध्ये जागत रहाते....

पुस्तकाचे प्रकाशन रोहन प्रकाशन यांनी केले आहे. पुस्तकांचे मुखपृष्ठ राजू देशपांडे यांनी साकारले आहे. पुस्तकांमध्ये कॅमेऱ्याने टिपलेली लेट नाईट मुंबईची छायाचित्रे वाचकाचे लक्षवेधून घेतात. ती छायाचित्रे विक्रम ताटवे यांनी काढली आहेत. प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे आणि प्रत्येक वाचकाने वाचावे असे हे पुस्तक लेखक प्रवीण धोपट लिखित लेट नाईट मुंबई !



जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर click करा

https://rohanprakashan.com/product/late-night-mumbai/

आमच्या चॅनेलला आजच भेट द्या  https://youtu.be/5VIjOdHZY1w

Sunday, November 21, 2021

दाहक अधर्मयुध्द

 



अधर्मयुध्द

 

                         लेखक- गिरीश कुबेर.

 

 

आजकाल धर्माच्या नावावर लोकांना भडकावणे सहज सोपे झाले आहे. 'धर्म ही अफूची गोळी आहे.', मार्क्सचं हे वचन सिद्ध करते. धर्म या गोष्टीचा फायदा नेहमी तीच लोकं घेतात ज्यांच्या पोटाची ददात मिटलेली असते आणि त्यांना सत्ता खुणावत असते. धर्म नावाची ही अफूची गोळी गरीब आणि अशिक्षित जनतेला सहज दिली जाते. या खेळामध्ये तरुण मंडळींना ओढून त्यांच्या कच्च्या मेंदूला धर्माचा मुलामा लावून आपल्याला हवा तो आकार देता येतो. आणि मग सुरु होतो धर्माच्या नावाचा रक्तरंजित प्रवास. पण धर्माच्या नावावर सत्ता मिळवणाऱ्यांना हे माहित नसतं की धर्माच्या नावाने सत्ता मिळवता आली तरी ती टिकवण्यासाठी धर्म पुरेसा नसतो.

नमस्कार मंडळी, धर्म आणि धर्माच्या नावावर केलेले राजकारण आणि त्यांची जिहादची भाषा ऐकून धर्माबद्दलचे भलेबुरे गैरसमज पसरवले जातात. पण त्यांच्या धर्मांधतेचा फायदा घेऊन स्वतःची पोळी भाजून घेणारे नेहमी पडद्याच्या मागेच राहिले आहेत. आज एका अशा पुस्तकाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्हाला या सगळ्या विषयांची सखोल आणि अभ्यापूर्वक माहिती देईल. मी बोलत आहे लेखक गिरीश कुबेर लिखित 'अधर्मयुध्द' या पुस्तकाबद्दल.

२४५ पानांच्या या पुस्तकामध्ये इस्लामी दहशतवादी संघटनांचा उगम कुठून आणि कसा झाला. त्या सोबत त्याचे उद्देश काय होते नि त्यांना खत पाणी घालून वाढवणारे कोण होते याविषयी अत्यंत सखोल विश्लेषणात्मक माहिती सुमारे १५ प्रकरणातून मिळते. यासर्व घडामोडींचा इतिहास सुरु होतो विसाव्या शतकापासून. एका अशा युगाची सुरुवात ज्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात मानव उत्तुंग भरारी घेत होता. ते युग होतं, ऑटोमन साम्राज्याच्या उताराचं. इस्लामीक देशांमध्ये सापडणाऱ्या तेलावर काही देशांचा डोळा होता. हे संपूर्ण तेल आपल्याला मिळावे आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्या देशांची तयारी होती. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, रशिया आणि यामध्ये सर्वात पुढे होती ती महासत्ता अमेरिका. स्वतःच्या फायद्यासाठी अमेरिकेने कोणत्या प्रकारचे राजकारण करून इस्लामीक देशातील धर्मांध माथेफिरूंना हाताशी धरून त्यांच्या दहशतवादी संघटनांना कशा प्रकारे खत-पाणी घालून वाढवले. पुढे हाच अमेरिकेचा डाव त्यांच्यावरच ९/११ च्या रूपाने कसा उलटला इथं पर्यंतची सखोल माहिती लेखक गिरीश कुबेर यांनी या पुस्तकामध्ये मांडली आहे.

 मुस्लिम ब्रदरहूड म्हणजेच कुविख्यात ब्रदरहूड, हमास, पँलेस्टिनी संघटना, अल कायदा, काही राजकारणी पक्ष जमाते इस्लामी या संघटनांमधील नेत्याची माहिती आणि त्यांनी केलेल्या सर्व गोष्टी आणि त्यांना वेळोवेळी मिळालेली आर्थिक मदत आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळते. फक्त दहशतवाद आणि दहशतवादी संघटना यांच्या बद्दलच नाही तर त्याचे अर्थकारण, त्यांच्या इस्लामीक बँकांविषयही एक स्वतंत्र प्रकरण 'बँकांचं ब्रदरहूड' यामध्ये वाचायला मिळतं. इस्लामीक देशातील धर्मांध राजकारण आणि त्याला असलेली काही देशांची मदत या व्यतिरिक्त पाकिस्तान आणि त्याची आयएसआय यांनी कसं येडा बनून पेढा खाल्ला आहे. पेढा म्हणजे काय आणि तो कोणाकडून खाल्ला असेल हे वाचकांना हे पुस्तक वाचल्यावर समजून येईल. सध्या महाराष्ट्र राज्य आणि देशामध्ये गाजत असेलेल्या ड्रग्स, गांज्या, हेरॉईन सारख्या प्रकरणातील या अंमली पदार्थांचा उगम कुठून झाला आणि त्याची उलाढाल किती करोडो डॉलर्स पर्यंत पोहोचली होती त्याबद्दल सुद्धा आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं.

या आधी लेखक गिरीश कुबेर यांची पुस्तकं वाचली आहेत. त्यामध्ये 'एका तेलियाने', 'युद्ध जीवांचे', 'हा तेल नावाचा इतिहास आहे', 'टाटायन' आणि आता हे पुस्तक अधर्मयुध्द. या सर्व पुस्तकांमधून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे लेखकाचा जागतिक राजकारणातील सखोल अभ्यास. प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी त्या विषयासंदर्भांतील संदर्भ ग्रंथांची माहितीसुद्धा ते वाचकांच्या समोर ठेवतात. प्रत्येक घटना आणि त्यामागचा इतिहास लेखक वाचकांसमोर असा मांडतात जणू ते एक equation मांडत आहेत. त्यामुळे वाचक त्याच्या लिखाणाकडे ओढला जातो. आजच्या social media च्या जगामध्ये एखाद्या विषयावर स्वतःचे मत मांडायचे असेल तर योग्य अभ्यास असावा लागतो हे लेखक गिरीश कुबेर यांच्या प्रत्येक पुस्तकांमधून आणि त्यांनी लिहिलेल्या लेखनमालिकेतून दिसून येते. हे पुस्तक वाचते वेळी एक गोष्ट लक्षात येते की २००९ मध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक,त्यानंतर सुमारे ११ वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेले असले तरी परिस्तिथी तिच आहे. अजून सुद्धा लोकांना जातीच्या, धर्माच्या नावावर भडकवले जाते आणि पडद्यामागचे  लोक आपला स्वार्थ साधून घेतात.

पुस्तकाचे प्रकाशन 'राजहंस प्रकाशन' यांनी केले आहे. धर्मावर आधारलेलं हे राजकारण आणि त्यामुळे उद्भवलेले अधर्मयुद्ध हे किती दाहक आहे याचे दर्शन घडवणारे पुस्तकाचे मुखपृष्ठ कमल शेडगे यांनी केले आहे. प्रत्येक अभ्यासू वाचकाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक लेखक गिरीश कुबेर लिखित 'अधर्मयुद्ध'..


Sunday, May 30, 2021

अतिशय सखोल अभ्यास करुन लिहिले गेलेले आणि म्हणूनच संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे.




लज्जागौरी

                लेखक - रा.चि. ढेरे

 

आपला देश हा विविध संस्कृती आणि परंपरांनी नटलेला देश आहे. त्याला लोकसंस्कृतीचा मोठा वारसा आहे. आपल्या देशाचा धार्मिक पौराणिक इतिहास खूप मोठा आणि परिपूर्ण आहे. इतिहासामध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचे, प्रसंगांचे, व्यक्तींचे संशोधन खूप लोकांनी, संस्थांनी केले आहे. पण पौराणिक गोष्टींचे संशोधन करणारे आणि त्यातही देवीदेवतांच्या इतिहासाचे, त्यांच्या संधर्भात सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींचे, त्यांचे विविध भागात सापडल्या जाणाऱ्या मूर्तींचे, उपासनांचे संशोधन आणि योग्य विश्लेषण करणाऱ्या व्यक्तीमध्ये आवर्जून नाव घ्यावे असे व्यक्तिमत्व म्हणजे मराठी इतिहास संशोधक, लेखक रा.चि. ढेरे.

 देवीदेवतांच्या विषयावर संशोधन हा विषय तसा चाकोरी बाहेरचा. तुम्ही केलेले संशोधन लोकांना पटले नाही तर विनाकारण वाढ ओढवून घेण्याचे प्रसंग घडतात. पण लेखक रा.चि. ढेरे हे याबाबतीत अपवाद ठरतात. त्यांनी तुळजाभवानी, महाक्ष्मी, दत्त, विठोबा, खंडोबा, गणपती या आणि अशा अनेक देवीदेवतांवर संशोधन करून आपले मत मांडले. पुर्ववैदिक मातृसत्ताक समाज आणि तत्कालिन समाजाने लैंगीकता आणि निसर्ग याची घातलेली सांगड या गोष्टींवर भाष्य करणारे 'लज्जागौरी' हे पुस्तक घेऊन आज तुमच्या भेटीला आलो आहे.

या २७२ पानांच्या पुस्तकामध्ये दक्षिण भारतामध्ये उत्खननातून सापडलेल्या आदिशक्तीच्या विविध मूर्तींची माहिती, पुरातन काळातील इतिहास, त्यांची केली जाणारी उपासना आणि त्या उपासनेचा हेतू, आदिशक्तीची विविध रूपे आणि त्याच्या उपासनेत आणि नावांमध्ये असणारे साम्य या आणि अशा  बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. महाराष्ट्रामधील काही भाग आणि त्यासोबत दक्षिण भारत, उत्तरपूर्व भारतामध्ये उत्खन्ना दरम्यान सापडलेल्या आदिशक्तीच्या मुर्ती ज्या नाभी पासुन खालचा भाग असणाऱ्या आणि काही योनी रूप असलेल्या आहेत. विश्वासर्जनाची देवता म्हणून त्यांची सर्व भारत देशामध्ये उपासना केली जाते. त्यासोबत ज्या ज्या ठिकाणी या मुर्ती सापडल्या त्या ठिकाणचा पुरातन इतिहास आणि त्यांच्या नावाचे अर्थ यासर्वांची अभ्यासपूर्व मांडणी लेखकांनी या पुस्तकामध्ये केली आहे.  

जोगुलांबा, एल्लम्मा, रेणुका आणि भूदेवी याचे एकमेकांशी असणारे साम्य, त्याच्या पुरातन इतिहासामध्ये असणारी जमदग्नी, परशुराम आणि रेणुका यांची कथा या साऱ्याचा जोड देऊन आदिशक्तीच्या या विचित्र मूर्तीचे विश्लेशन लेखकांनी उत्तम प्रकारे केले आहे. देवीच्या उपासनेत कवडीचे (कवडीची माळ त्यामधील कवडी ) असणारे स्थान आणि कवडीचा योनीसदृश्य आकार याची माहिती आणि त्याचे विश्लेशन यामुळे वाचनामध्ये रंजकता येते. यासोबत दख्खनचे कुलदैवत श्री क्षेत्र जोतिबा याचा संपुर्ण इतिहास, त्याच्या नावाची फोड म्हणजे जोतिबा हे नाव कसे पडले, त्याचे उपासक आणि उपासना, त्याच्या आसपासच्या सर्व देवी-देवतांची मंदिरे, त्याच्या इतिहास, जोतिबा आणि यमाई यांच्या विवाहाची कथा, जोतिबा आणि खंडोबा यांचे एकमेकांशी असणारे साम्य, यासोबत जोतिबा देवाशी निडीत असणाऱ्या सर्व गोष्टींचे विश्लेशन लेखकाने किती अभ्यासपूर्वक लिहिले आहे हे समजते.

जोतिबा सोबतच मातंगी,एल्लम्मा,रेणुका आणि परशुराम यांचा इतिहास,उपासक आणि उपासना याची सर्व माहिती आपल्याला अभ्यासू दृष्टीने मिळते. आपल्या देशांच्या काही भागांमध्ये वारुळाची सुद्धा पूजा केली जाते. वारुळ हे भूमीचे-भूमीच्या सर्जनेंद्रियाचे प्रतीक मानले जाते आणि वारुळाला गर्भाशयाचे प्रतीक सुद्धा मानले जाते, आजही वारूळ रूपात किंवा कामाख्या मंदिरात योनि स्वरूपात तिची पुजा केली जाते; विशेष म्हणजे जीथे शक्तिपिठ आहे, देवीचे  मंदिर आहे तिथे वारूळ असतेच. विविध रूपांनी नटलेले संपूर्ण विश्व मानवीजीवन स्वतःची कूस उसवून जिने निर्माण केले ती आदिशक्ती, जगन्माता, उत्तान मही पृथ्वी, अदिती, रेणुका यांचा पुरातनकाळा पासूनचा संपूर्ण इतिहास अभ्यास पूर्वक मांडणीने सांगणारे असे हे पुस्तक आहे.

पुस्तकाचे प्रकाशन पद्मगंधाप्रकाशन यांनी केलेले असून पुस्तकाचे मुखपृष्ठ रविमुकुल यांनी केले आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लज्जागौरी मातेचा शिरा पासून खालचा भाग असणाऱ्या मूर्तीचे छायाचित्र आहे. मुखपृष्ठावर असलेली प्रतिमा लज्जगौरीची म्हणजेच प्रकृती / पृथ्वि जी  नवसुर्जनासाठी तयार आहे. तिची  पुजा शेतपेरणी आधी, लग्नाआधी सुफल प्राप्तिसाठी करतात. ही  रोमन संस्कृतीमधील प्रजनन देवता व्हिनस सारखी आहे. अतिशय सखोल अभ्यास करुन लिहिले गेलेले आणि म्हणूनच संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे. प्रत्येक वाचकाने वाचावे आणि  प्रत्येक अभ्यासू व्यक्तीच्या आणि वाचकाच्या संग्रही असावे असे हे  लेखक रा. चि.ढेरे लिखित लज्जागौरी!