Showing posts with label कथासंग्रह. Show all posts
Showing posts with label कथासंग्रह. Show all posts

Sunday, January 14, 2024

माणसाच्या जगण्यातील प्रामाणिकपणाचे नितळ प्रतिबिंब या कथा संग्रहातील तीनही कथांमध्ये लेखकाने मांडलेले दिसून येते.

 



बाळूच्या अवस्थांतराची डायरी

                              लेखक - किरण गुरव

 

 

२०२१ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कथा संग्रह. १४७ पानांच्या या कथासंग्रहामध्ये ३ कथा आहेत. पहिली कथा आहे, बाळूच्या अवस्थांतराची डायरी. दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी पास होऊन, उच्चशिक्षणासाठी बाळूला होस्टेलला सोडण्यासाठी गावाहून घरची सगळी मंडळी कोल्हापूरला येतात. रंकाळ्याच्या एस.टी  स्टॅन्ड पासून ते शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या हॉस्टल पर्यंतचा त्यांचा प्रवास या कथेमध्ये आहे. बाळू हा या कथेचा केंद्र बिंदू आहे आणि त्याच्या प्रथम पुरुषी निवेदनातून या प्रवासा दरम्यानच्या छोट्या-मोठ्या गोष्टी तपशीला सह लेखकाने मांडल्या आहेत. ज्यामुळे कथा खूपच रंजक झाली आहे. गावच्या वातावरणात वाढलेला बाळू, माध्यमिक, उच्चमाध्यमिक शैक्षणिक प्रगती करत करत आता महाविद्यालयीन शैक्षणिक जगात अवस्थांतरीत होताना बाळूचं काही तरी मागं राहून गेलं आहे किंवा त्यानं काहीतरी कायमचं गमावलं आहे, यासर्वांचा प्रवास या कथेमध्ये आहे. या कथेचे वेगळेपण किंवा लेखक किरण गुरव यांच्या कथांमध्ये, कथानुरूप आजू-बाजूच्या परिसराचे वर्णन, वातावरणातील बदल यासोबतच कथेतील पात्रांचे त्या परिसराशी, वातावरणाशी असलेली एकसंधता. यामुळे कथा भन्नाट आणि वाचनीय होते.

या संग्रहातील दुसरी कथा आहे, इंदुकलर : चरित्र,काळ आणि निर्मिती यांची अन्वेषणकथा. ही कथा इंदुलकर नामक काल्पनिक व्यक्तीची आहे. प्रत्येक माणसाचे आयुष्य म्हणजे एक कथा असते. त्याच्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी आणि प्रत्येक प्रसंगानुरूप त्याला वेगवेगळी माणसं भेटतात किंवा त्याच्या रोजच्या कार्यक्षेत्रात त्याचा नेहमीच्या माणसांसोबत राबता असतो. याच घटकांची आणि घटनांची गुंफण त्याचे आयुष्य कथेमध्ये रूपांतरित करतात. इंदुलकरांची कथा ही त्यांच्या नेहमीच्या दिनचरीयेने सुरु होते. लेखनाने इंदुलकरांची कथा तीन भागांमध्ये मांडली आहे. ऑफिसकथा, घरकुटुंबकथा आणि स्वप्नकथा. या कथा वास्तव आणि काल्पनिकतेची सरमिसळ असणारी आहेत.

तिसरी कथा आहे, बाजार दि मार्केट. ही कथा विशेष मनाला भावली. याचे कारण कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, गारगोटी, भोगावती, मुरगूड या ठिकाणचे होणारे आठवडी बाजार मी पाहिले आहेत. आजू-बाजूच्या खेड्यातील, पाडयावस्तीतील लोक या आठवडी बाजारावर खरेदीसाठी आणि विक्री साठी अवलंबून असतात. एका कोपऱ्यावरच्या मोऱ्यांच्या दुकानापासून या संपूर्ण बाजाराची मांडणी, तिथे घडणारे छोटे मोठे प्रसंग या कथेमध्ये मांडले आहेत. या आठवडी बाजाराचं इतंभूत वर्णन लेखकाने या कथेच्या माध्यमातून केलं आहे. ही कथा वाचतेवेळी निश्चितच वाचकाला त्याच्या गावातील आठवडी बाजार आठवेल यात शंखा नाही. 

किरण गुरव यांची कादंबरी जुगाड असो वा श्रीलिपी, राखीव सावल्यांचा खेळ या कथासंग्रहातील कथा असोत या सर्वांचे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी शब्दात व्यक्तीचे व्यक्तिचित्र ते उभं करतात. सध्या सोप्प्या भाषेतलं त्याचं लिखाण कायम वाचकांना भुरळ घालत आहे. माणसाच्या जगण्यातील प्रामाणिकपणाचे नितळ प्रतिबिंब या कथा संग्रहातील तीनही कथांमध्ये लेखकाने मांडलेले दिसून येते. या पुस्तकाचे प्रकाशन शब्द प्रकाशन यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ रियेश पाटील यांनी केले आहे. प्रत्येक वाचकाने वाचावे आणि आपल्या संग्रही असावे असे हे कथा संग्रह, किरण गुरव लिखित बाळूच्या अवस्थांतराची डायरी.


Monday, May 23, 2022

समाजातील हिंस्त्र वास्तवाचा शोध घेणारे कथासंग्रह

 



दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट

 

                               लेखक - प्रणव सखदेव

 

नमस्कार मंडळी आज एक असे पुस्तक घेऊन मी तुमच्या भेटीला आलो आहे, त्यामधील कथा आपल्याला समाजातील दाहक वास्तवाचे चित्रण करतात आणि मराठी कथासाहित्याला एक वेगळे वळण देणारे आहे. या कथा संग्रहाच्या माध्यमातून लेखकाने मध्यमवर्गीयांच्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. मी बोलत आहे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रणव सखदेव लिखित "दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट" या कथा संग्रहाविषयी.

१६८ पानांच्या पुस्तकामध्ये ८ कथा आहेत. प्रत्येक कथाही वाचनीय आहे. प्रत्येक कथा वाचकाला तिच्या सोबत धरून ठेवते. समाजभावना जागृत करणाऱ्या या  कथा वाचकाला तिच्या भाव विश्वामध्ये घेऊन जाते. लेखक प्रणव सखदेव याचे विशेष कौतुक वाटते कारण आजच्या आणि उद्याच्या बदलत्या समाजाचे प्रतिबिंब त्यांनी या कथा संग्रहाच्या माध्यमातून वाचकांना समोर आणि पर्यायाने समाजासमोर शब्दांच्या माध्यमातून मांडले आहे.

"आठवलेची एक आठवण" या कथेमध्ये आठवले या सफाई कामगारासाठी एक आठवण इतकी गरजेची असते कि त्या आठवणीमुळे त्याच्यासाठी स्वर्गाचे दार उघडणार असते. पण सरतेशेवटी ती आठवण खोटी असते आणि त्याला समाजाने दिलेली वागणूक इतकी हिन असते कि त्याद्वारे समाजाचे वास्तव आपल्या समोर येते आणि त्यासोबत खोट्या आठवणीला लाथ मारून स्वतःला स्वर्गापासून दूर करणाऱ्या आठवलेचा हेवा वाटतो.

"एक कुत्ते की मौत" सोसायटीमधील पाळीव कुत्र्यांनी रस्त्यावर, सोसायटीच्या गेट जवळ, नेहमीच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर शी करणे हे काही नवीन नाही, पण याच गोष्टीमुळे त्या पाळीव कुत्र्यांच्या मालकाची आणि एखाद्या सोसायटीच्या सदस्यांसोबत भांडणे होतच असतात, कथेमधील हा प्रसंग जरी साधा असला तरी लेखकाने त्याला रहस्यतेचा आधार देऊन हि कथा खूपच रंजक केली आहे.

"खचणारे बहर माथी घेऊन" जर तुम्ही लेखक प्रणव सखदेव यांचा "निळ्या दातांच्या दंतकथा" हा त्यांच्या पहिला कथासंग्रह जर तुम्ही वाचला असेल तर त्यामधील "कथा सांगण्याची गोष्ट" या कथेमधील पात्रे, तेच कथानक घेऊन लेखकाने एक दीर्घ कथा खचणारे बहर माथी घेऊन या नावाने लिहिली आहे. हा पुनर्लेनखनाचा प्रयोग लेखकाने उत्तम प्रकारे हाताळलेला आहे. हा पुनर्लेनखनाचा प्रयोग वाचकाला समजून घ्यायचा असेल तर माझ्यामते वाचकांनी "कथा सांगण्याची गोष्ट" हि कथा जरूर वाचली पाहिजे.

"बियास का उधाणली त्याची गोष्ट" या कथेमध्ये यांत्रिक कंपनीच्या रोबोट्सच्या गैर वापरातून एक भीषण सत्य समोर येते.कथेमधून आजच्या यांत्रिक युगाचे आणि उद्याच्या नव्या यांत्रिक जगाचे आणि त्यासोबत लोकांच्या बदलत्या मतलबी वृत्तीचे दर्शन होते.

"दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट" या शीर्षककथेमध्ये पाककलेचे दर्शन होते. या कथेमधील 'पंचकलिका' हा जरी कल्पित पदार्थ असला तरी त्याची रेसिपी वाचून तोंडाला पाणी सुटते आणि तो पदार्थ एकदा तरी करून पाहायला हवा असा मोह होतोच. यासोबतच उच्च-नीचतेच्या माध्यमातून माणसा माणसांमध्ये केले जाणारे भेद आणि त्यामुळे निष्पाप लोकांची होणारी होरपळ हा विषय लेखकाने या कथेद्वारे अधोरेखीत केला आहे.  या कथा संग्रहातील इतर कथा सुद्धा वाचकांनी जरूर वाचाव्या त्याच्या माध्यमातून वाचकांना नक्कीच काही तरी वेगळे आणि भन्नाट वाचायला मिळेल यात शंका नाही.

पुस्तकाचे प्रकाशन रोहन प्रकाश यांनी केले आहे. मोहर या मुद्रे अंतर्गत दर्जेदार फिक्शन आणि ललित साहित्य वाचकांपर्यंत पोहचावे यासाठी रोहन प्रकाशन नेहमीच प्रयत्नशील असतात. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि पुस्तकामधील रेखाचित्रे अन्वर हुसेन यांनी साकारली आहेत. प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे आणि सामाजिक भावना असणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक लेखक प्रणव सखदेव लिखित "दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट"



जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर click करा

https://rohanprakashan.com/product/dimitri-riyaz-kelkarchi-goshta/

आमच्या youtube चॅनेलला आजच भेट द्या

https://youtu.be/5VIjOdHZY1w

Sunday, February 27, 2022

आख्यायिका आणि दंतकथांच्या गोठण्यातल्या गोष्टी

 


गोठण्यातल्या गोष्टी.

 

लेखक - ह्रषीकेश गुप्ते.

 

 

प्रत्येक माणसाचं आयुष्य एक कथाच असते.त्याला आलेले अनुभव, त्याला भेटलेली माणसं, त्याच्या आजू-बाजूचा परिसर यासर्वांची एकत्रित बांधणी शब्दांमध्ये केली तर एक कथा तयार होऊ शकते. त्याच्या सोबत घडलेले ते सर्व प्रसंग, त्याला भेटलेली ती माणसं त्याच्या गावाचीच असतील तर...? एखादं गाव हे कधीच म्हातारं नसतं किंवा ते कधीच तरुण सुद्धा नसतं. ते फक्त जिवंत असतं चिरंतन चिरकाल, प्रत्येक गाव हे त्याच्यामध्ये त्या गावच्या प्रत्येक घडामोडी, प्रत्येक नवे-जुने बदल आपल्यामध्ये सामावून घेऊन जिवंत असतं. आणि अशाच गावांमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला हस्तांतरीत केल्या जातात पण गाव तिथंच असतं जणू त्यासर्व गोष्टींचा साक्षीदार. याच गावाकडच्या गोष्टी सांगणारे पुस्तक घेऊन मी तुमच्या भेटीला आलो आहे. लेखक ह्रषीकेश गुप्ते लिखित गोठण्यातल्या गोष्टी.

२२३ पानांच्या या पुस्तकामध्ये गोठणे नामक एक काल्पनिक गावातल्या गोष्टी आहेत. या गोष्टी त्या गावातील काही व्यक्तिरेखांवर आहेत, त्या द्वारे लेखकाने त्या गावातील रूढी-परंपरा, गावातील काही प्रमुख वास्तू, मंदिरे, बाजार पेठा यांचे सुद्धा समावेश आहे.’सुलतान पेडणेकर’,’ जिताडेबाबा’, ‘जयवंतांची मृणाल’, ‘खिडकी खंडू’, ‘मॅटिनी मोहम्मद’, ‘रंजन रमाकांत रोडे’, ‘गोलंदाज’ या व्यक्तिरेखांच्या गोष्टींच्या माध्यमातून  लेखकाने संपूर्ण गाव या पुस्तकामध्ये मांडला आहे. पुस्तकातील या सात कथा लेखक आपल्या सांगत आहे. गावामध्ये घडणारी प्रत्येक घटना, प्रसंग, गोष्टी या तिरहित व्यक्तीला समजतात तेव्हा त्याला थोडा रंजकतेचा,  थोड्या अंगाच्या चार वाढीव गोष्टींचा समावेश असतोच आणि त्याचे प्रत्यंतर आपल्याला या पुस्तकातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये वाचायला मिळते.

सुलतान पेडणेकर हा लेखकाच्या घरी काम करणाऱ्या इबूचा म्हणजेच इब्राहिमचा मुलगा. त्याचं काम लेखकासोबत शाळेला जाणे आणि त्याच्यावर नीट लक्ष ठेवून शाळा सुटल्यावर लेखकाला घरी घेऊन येणे. भूत पकडण्याच्या, जादू टोण्याच्या, खजिन्याच्या गोष्टी सुलतान हा त्याच्या मोहक भाषेमध्ये सांगत असतो. कधी कधी त्यानेच बोललेल्या गोष्टी त्यालाच आठवत नसतात असा हा सुलतान विरोधाभासाचं अजब रसायन,  त्याच सुलतान हे नामकरण कसे झाले याची सुद्धा एक रंजक कथा आहे.

जिताडेबाबा हे मत्स्य आणि मांसाहारीप्रेमी व्यक्तिमत्व फक्त गावातच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेलं. जिताडा हा दोन-अडीच ते सात-आठ किलो पर्यंत वाढू शकणारं मासा. आणि याच माश्याच्या एका गोष्टीमुळे तात्या दुर्वे यांना जिताडेबाबा हे नाव कायमचे चिकटले. या जिताडप्रेमाची कथा वाचकाला मोहिनी घालते.यासोबतच या कथेमध्ये लेखकाने मांसाहारी जेवणाचं, विशेषतः माश्याच्या कालवणाचे आणि इतर पदार्थांचे केलेले वर्णन वाचून तोंडाला पाणी सुटते.

‘जयवंताची मृणाल’, मृणाल जयवंत दुर्वे, तिच्या प्रत्येक निर्णयाने ती गावामध्ये कायम तळपत आणि चमकत राहिली. सध्याच्या काळात सासरच्या आडनावासोबत माहेरचे आडनाव लावण्याची फॅशन असली तरी त्याकाळी माहेरच्या आडनाव नंतर सासरचे दुर्वे आडनाव लावून मृणालने गावाला एक मोठाच सांस्कृतिक धक्का दिला. सासरच्या घराला वाळवी लागली म्हनूण ती जागा बिल्डरला विकसित करायला देणे, असे बरेच धक्के तिने दिले आणि ते सर्व आपल्याला या कथेमध्ये वाचायला मिळतात.

‘खिडकी खंडू’,  कोवळ्या वयातच या मुलावर एक कौटुंबिक आघात होतो, ज्या वयात मुले स्वछंदपणे खेळतात त्यावयातच झालेल्या आघाताने तो पुरता हादरून जातो. त्याची कथा सांगतेवेळी लेखकाला पडलेले प्रश्न विचार करायला भाग पडतात. कोणत्याही गोष्टीला न घाबरणारा खंडू मग ते तळ्याच्या भुयारी जलमार्गातून पोहत रामटेकच्या ओहळापर्यंत जाण्याचे धाडसी कृत्य गावातल्या राती-महारातींना जमले नाही ते याने केले. पुढे या खंडूला स्मगलर खंडू, मुताऱ्या खंडू, कोयत्या खंडू, अशा उपाध्या मिळत गेल्या आणि त्या प्रत्येक उपाधीमागची कथाही तितकींच विनोदी आणि रंजक आहे. यासोबतच गावाला या अशा उपाध्या देण्याच्या सवयींवर सुद्धा लेखकाने भाष्य केले आहे.

मॅटिनी मोहम्मद, रंजन रमाकांत रोडे, गोलंदाज पुस्तकातील या गोष्टींबद्दल सुद्धा बोलावस तितका कमीच आहे. प्रत्येक कथा ही वाचकाला त्याच्या सोबत धरून ठेवते. प्रत्येक कथा ही सुरस आणि रंजक आहे. स्वतःचं असं वेगळेपण लेखकाने प्रत्येक कथेला दिले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यासर्व व्यक्तिरेखा ज्या गावामध्ये आहेत, त्या गावाचे वर्णन लेखकाने अत्यंत योग्य आणि सुंदर पद्धतीने केले आहे. वाचकाला त्या गावामध्ये गेल्याचा भास निर्माण होतो. प्रत्येक गाव हे त्याच्या स्वतःमध्ये त्याचं असं वेगळेपण, वेगळं महत्व घेऊन उभं असतं. एखाद्या अमरत्व प्राप्त झालेल्या योद्धा सारखं. लेखकांच्या मते पुस्तकातील या सर्व कथा या काल्पनिक, दंतकथा आहे. याचा खऱ्या आयुष्यासोबत साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.

पुस्तकाचे प्रकाशन रोहन प्रकाशन यांनी केले आहे. रोहन प्रकाशन यांनी त्याच्या दर्जेदार साहित्य निर्मितीच्या माध्यमातून वाचकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि पुस्तकामधील रेखाचित्रं अन्वर हुसेन यांनी साकारली साकारली आहेत. प्रत्येक वाचकाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक!


लेखक ह्रषीकेश गुप्ते लिखित गोठण्यातल्या गोष्टी.


जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर click करा

https://rohanprakashan.com/product/gothanyatalya-goshti/


आमच्या चॅनेलला आजच भेट द्या   https://youtu.be/5VIjOdHZY1w


Sunday, October 3, 2021

तिसरा डुळा, मानवी समाजातील अप्रकाशित लोकांवर प्रकाश टाकणारा....





तिसरा डुळा

 

लेखक - किरण येले  

           

 खूप दिवसांनंतर एक भन्नाट असा कथा संग्रह वाचायला मिळाला. या कथा संग्रहामधील प्रत्येक कथा सुरस आहे. विशेष कौतुक म्हणजे लेखकाच्या भोवती घडणाऱ्या घटनांचे, त्याच्या आयुष्यामध्ये आलेल्या व्यक्तींचे बारीक निरीक्षण करून त्या सर्वांना कथेच्या स्वपरुपामध्ये एकत्र आणून त्याची उत्तम मोट बांधली आहे. या आधी लेखकाने लिहिलेला कविता संग्रह वाचला होता, अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये मांडणी केली असली तरी प्रत्येक ओळ ही काळजाला भिडणारी. मंडळी मी बोलत आहे, कवीकथाकारनाटककार किरण येले यांच्याबद्दल. त्यांनी लिखाणबद्ध केलेला कथासंग्रह 'तिसरा डुळा' या कथासंग्रहाबद्दल आज मी लिहिणार आहे.

१९२ पानांच्या या कथा संग्रहामध्ये ७ कथा आहेत. ज्या survival of fittest या सृष्टीच्या नियमावर आधारलेल्या आहेत. या सर्व कथा त्या लोकांच्या आहेत जे समाजाच्या एका कोपऱ्यामध्ये आहेत. ज्यांच्यावर कधीच प्रकाश पडलेला नाही.  ती सर्व लोकं या आधी लेखकाच्या आयुष्यात कधी ना कधी आलेली आहेत किंवा येऊन गेलेली आहेत, त्या सर्वांचे तपशीलवार वर्णन लेखकाने केले आहे. अशा प्रकारे या सात कथांनी हा कथासंग्रह बनला आहे. जो अक्षरशः वाचकाच्या मनाचा ठाव घेतात,वाचकाला त्याच्या सोबत धरून ठेवतो. 

धार्मिक दंगल म्हणजे दोन धर्मांतील मूर्ख अनुयायांत झालेली दंगल या पंच लाईनवर आधारीत काही कथा या संग्रहामध्ये आपल्याला वाचायला मिळतात, मग त्यामध्ये हारून फ्रेम वर्क्स, “इस्साक पक्का हिंदू होता, असुविधा के लिये खेद है, जावेद जिवंत आहे. या कथा त्या लोकांच्या आहेत जे आपल्या समाजामध्ये मिसळून राहण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आपल्या समाजातील काही लोक अजून त्यांना आपलं म्हणायला तयार नाहीत. कथा वाचून पूर्ण झाल्यावर आपल्याला वर नमूद केलेल्या विषयाचे गांभीर्य समजून येते. तसेच इतर कथा म्हणजे झुंबर, प्रॉपर्टी एक्सिबिशन, तिसरा डुळा या कथांचा विषयसुद्धा भन्नाट आहे.

ज्या कथेच्या नावावरून या कथासंग्रहाचे नाव आहे ती कथा म्हणजे 'तिसरा डुळा'. ही कथा माझ्या खूप जवळची आहे. कथेचा नायक म्हादू हा एक छोटा मुलगा आहे ज्याची भगवान शिवावर खूप भक्ती आहे, तो भगवान शिवांना आपला मित्र मानतो आहे. देवाला शंकर असं एकेरी नावाने बोलावलं तर त्याला राग येतो. असीम भक्ती असणारा हा छोटा म्हादू त्याला ही भक्ती त्याच्या बापाकडून ज्याला तो जगड्या म्हणून हाक मारतो. त्याची आई मंगळी तिला सुद्धा तो आई न म्हणता मंगळी म्हणून हाक मारतो आहे. गाव गावांमध्ये होणाऱ्या जत्रांमध्ये भगवान शिवांची चित्र काढून,दोरीवरचे खेळ करून उदरनिर्वाह करणारे हे कुटुंब. एक प्रसंग असा घडतो ज्यामध्ये जगड्याचा मृत्यू होतो आणि मंगळी समोर म्हादूला घेऊन पुढचे आयुष्य कसे व्यथित करायचे असा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा तिला एक कल्पना सुचते, येणाऱ्या जत्रेमध्ये म्हादुला भगवान शिवांचे सोंग घेऊन,नाच करायला लावायचा आणि त्यातून पुढच्या आयुष्याचा रोजगार करायचा. आपण भगवान शिवांचे सोंग घ्यायचे या कल्पनेनेच म्हादू हरकून जातो. महादेवाप्रमाणे आपल्याला ही तिसरा डोळा असावा असे त्याला वाटते. तिसरा डोळा उघडून वाईट गोष्टी नष्ट कराव्या असं त्याला वाटत असतं. पुढे एक अशी घटना घडते की त्यामुळे त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते.

कथा संग्रहामधील प्रत्येक कथा अप्रतिम आहे आणि वाचून पूर्ण झाल्यावर आपण त्या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करून विचार करू लागतो. पुस्तकाचे मुखपृष्ठ आपल्याला या पुस्तकाकडे खेचून घेते. ते मुखपृष्ठ साकारले आहे सतीश भावसार यांनी. पुस्तकांचे प्रकाशन ग्रंथाली प्रकाशन यांनी केले आहे.प्रत्येक वाचकाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक कवी,कथाकार,नाटककार किरण येले लिखित 'तिसरा डुळा'.


 

Sunday, June 13, 2021

भय,गुढ,रोमहर्षक या विषयी वाचण्याची आवड ठेवणाऱ्यांसाठी.

 



शाडूचा शाप

 

                                          लेखक - नारायण धारप.

 

त्यांच्या रहस्यमय आणि गूढ लेखनाने त्यांनी वाचकांच्या मनावर वेगळीच भुरळ घातली आहे. आजच्या पिढीसाठी त्यांचं नाव नवीन असेल पण त्यांच्या लिखाणाने एक काळ गाजवला होता. ज्या काळामध्ये दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती तेव्हा सामान्य वाचक त्यांच्या लेखनाची आतुरतेने वाट बघायचा. आजच्या सोशल मीडियाची क्रेझ असलेल्या पिढीलासुद्धा ऐवढीच ओढ लावायची ताकद त्यांच्या लिखाणात आहे. रहस्यमय आणि गूढ लेखनाच्या अव्वल स्थानी असणारे आणि वाचकाला त्यांच्या लेखणीद्वारे शेवटपर्यंत खेळवत ठेवणारे लेखक म्हणजे आदरणीय नारायण धारप.

नारायण धारप यांच्या अशाच रहस्यमय आणि गूढ लिखाणामधील एक कथासंग्रह मी आज तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे. 'शाडूचा शाप'.१११ पानाच्या या पुस्तकामध्ये एकूण पाच कथा आहेत. प्रत्येक कथा ही भन्नाट आणि अर्थपूर्ण आहे. लेखक नारायण धारप यांचे लिखाण वाचकाच्या मनाचा ठाव घेते. ते वाचकाला कथेसोबत धरून ठेवतात.

 'कुतूहल' माणसाच्या स्वभावाला जडलेला आजार आहे असं म्हंटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण या कुतूहलापोटी माणूस त्याला पडलेल्या विविध प्रश्नांचा,घटनांचा शोध घेतो. त्याच्या मूळापर्यंत किंवा त्याच्या तर्कापर्यंत जाण्याची त्याला खूप उत्सुकता असते. याच विषयाला धरून 'शाडूचा शाप' या कथा संग्रहातील प्रत्येक कथा आहे. 'शाडूचा शाप' या कथेची मांडणी आणि विषय खूप वेगळा आहे.

 जन्माला आलेल्या जुळ्या मुलांपैकी एक मूल मृत जन्माला येतं आणि त्याच्या मृत्यूचे कारण हे की त्याच्या जुळ्या भावानेच त्याला आईच्या गर्भामध्ये मारलेलं असतं. तर आता हा नेमका शाडूचा काय शाप आहे, हे जाणून घेण्यासाठी ही कथा जरूर वाचली पाहिजे.

दुसरी कथा आहे 'जाग'. वर म्हंटल्याप्रमाणे माणूस कुतुहलापोटी कधी कधी चुकीच्या गोष्टी करून जातो आणि नको ते संकट आपल्या पदरी पडून घेतो. कथेचे नायक प्रो.कारखानीस हे याच कुतूहलाच्या मोहाला बळी पडतात. एकदा ते  'चिंची' या गावी एका शिरवाडकर नामक व्यक्तीचा वाडा काही दिवसांसाठी भाड्याने घेतात. आणि याच वाड्यामध्ये एक विचित्र प्रकार त्याच्या सोबत  पुढचा थरार वाचायला मिळतो.

तिसरी कथा आहे, 'आपुले मरण'. एक निवेदक ही कथा सांगत आहे त्याच्या डॉक्टर मित्राला आलेल्या अनुभवाची. सरकारी हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर मित्राची ओळख त्याच्या एका पेशंट सोबत होते. या पेशंटला जेव्हा वेगळ्या वॉर्ड मध्ये भरती करायचे असते तेव्हा तो अशी काही गोष्ट त्या डॉक्टरला सांगतो ज्याने तो संभ्रमामध्ये पडतो. त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा तर त्याला त्याचा डॉक्टरी पेशा मान्यता देत नसतो. कोणती आहे ती गोष्ट...? काय होतं ते रहस्य..?

चौथी कथा आहे,'लक्ष्मी-कांचन',ज्यामध्ये कथेचा नायक आपल्या सेक्रेटरी सोबत लग्न करता यावे म्हणून आपल्या पत्नीला मारण्याची योजना आखतो. अत्यंत शिताफीने  तो हे कृत्य करतो पण पुढे जाऊन असे काही घडते ज्यामध्ये त्याचे संपूर्ण आयुष्य उध्वस्थ होते.

पाचवी आणि शेवटची कथा आहे, 'पुनरपि जन्म पुनरपि...', या कथेसाठी लेखकांचे विशेष कौतुक करावेसे वाटते. कारण कथेचा विषय इतका भन्नाट आहे की ज्यामुळे लेखक नारायण धारप यांचे लिखाण समृद्ध का असते हे समजून येते. विचार करा आपला घडून गेलेला भूतकाळ आपल्या चालू असलेल्या वर्तमानामध्ये  येऊन आपल्याला येऊ घातलेल्या भविष्यकाळाविषयी सांगत असेल,आपल्याला सावध करत असेल तर काय होईल. हे आपल्या फायद्याचे आहे ना..? म्हणजे ज्या चुका आपण भविष्यामध्ये करणार आहोत त्याची कल्पना आपल्याला मिळाल्यावर आपण त्या चुका सहज टाळू शकतो. आणि जर का आपण याकडे दुर्लक्ष केले तर....? याच गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे कथेच्या नायकाची, सदाशिव याची जी अवस्था झाली तिचं आपली होईल......

पुस्तकामधील प्रत्येक कथा या निवेदन स्वरूपाच्या आहेत. प्रत्येक कथा कोणी तरी दुसरी व्यक्ती सांगत आहे. पुस्तकाची भाषा,शब्द रचना साधी सरळ आहे. त्यामुळे वाचनामध्ये सहजता येते. प्रत्येक कथा आणि त्याचा विषय अत्यंत भन्नाट असल्यामुळे पुस्तक बाजूला ठेवूस वाटत नाही. पुस्तकाचे मुखपृष्ठ संतुक गोळेगावकर यांनी साकारले आहे. पुस्तकांचे प्रकाशन साकेत प्रकाशन यांनी केले आहे. भय,गुढ,रोमहर्षक या विषयी वाचण्याची आवड ठेवणाऱ्यांसाठी. प्रत्येक वाचकाने जरूर वाचावे असे हे पुस्तक लेखन नारायण धारप लिखित 'शाडूचा शाप'.


Sunday, March 28, 2021

एकविसाव्या शतकातील,गतिमान आणि प्रगतीची कास धरणाऱ्या शतकातील प्रश्नांना,समस्यांना थेट भिडणाऱ्या कथा,




श्रीलिपी

                                                  लेखक- किरण गुरव.

 

बऱ्याच दिवसांनंतर एक भन्नाट कथासंग्रह वाचायला मिळाला. गावागावातील राजकारण,विकासाचा आणि सोयी सुविधांचा अभावयामुळे जनतेची होणारी पिळवणूक,नात्यांमधील छोट्या-मोठ्या गोष्टी, जाती-जातींमधील अहंकार, भांडणे, राजकारण यासर्व गोष्टींचे  इतंभूत वर्णन ग्रामीण साहित्य, कथा-कादंबरीमध्ये वाचायला मिळतं. त्या लिखाणाशी समरूप होता येते. अशाच ग्रामीण भागातील लेखकांमध्ये एक आवर्जून घ्यावे असे नाव म्हणजे लेखक किरण गुरव यांचे नाव. लेखक किरण गुरव यांनी २००२ ते २००८ या काळामध्ये विविध दिवाळी अंक-मासिकांसाठी लिहिलेल्या काही कथांचा संग्रह असलेले 'श्रीलिपी' हे पुस्तक घेऊन आज मी तुमच्या भेटीला आलो आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक परिस्थितीचे तपशीलवार वर्णन लेखक किरण गुरव यांनी त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये केले आहे.

पाच कथांचा हा कथा संग्रह २१२ पानांचा आहे. त्यामध्ये काही कथा इतक्या मोठ्या आहेत की त्यांना लघु कादंबरी म्हंटले तरी चालेल. प्रत्येक कथा ही कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये घडणारी आहे. 'वडाप' या कथेचा नायक आंद्या. वडापची जिप गाडी चालवणाऱ्या तरुणाची ही कथा. एस.टी बसच्या आधी आणि कमी पैशामध्ये जलद पोहचवणारे वाहतुकीचे ग्रामीण भागातील सुलभ साधन म्हणजे वडाप. या वडापच्या गाड्यांमध्ये त्याची होणारी होरपळ, त्याच्या समस्या, त्याची चाललेली तगमग लेखकाने त्यासोबतच आजूबाजूच्या परिस्थितीच्या तपशीलवार वर्णनासह मांडली आहे.

'क्लॉक अवर बेसिस' ही कथा ग्रामीण भागातील तरुण शिक्षकावर आधारित आहे. असा शिक्षक जो गावातील कॉलेजमध्ये  क्लॉक अवर बेसिस म्हणजेच लेक्चरशीप वर काम करणारा आहे. अशा प्रकारचे तरुण ग्रामीण भागातील विविध शिक्षण संस्थामध्ये लेक्चर शिपवर वर्षानुवर्षे कधीतरी पर्मनंट होऊ या एकाच आशेवर काम करतात. काहींचे हे स्वप्न पूर्ण होते तर काहींचे स्थानिक राजकारणाला बळी पडून होरपळून जाते. अशाच तरुण शिक्षकाची ही कथा आहे. ज्यामध्ये ग्रामीण भागातील शैक्षणिक विश्वाचे वर्णन केले आहे. शैक्षणिक संस्थांमधील कुडघोरीचे राजकारण,समस्या यांचे वर्णन लेखकाने केले आहे.

पुढची कथा आहे. 'डिजिटल मृगजळाचा प्रवास' या कथेमधून लेखकाने ग्रामीण भागातील तरुण मुलांना द्योजक होण्यासाठी सरकारतर्फे विविध योजना राबवल्या जातात त्यामध्ये त्यांना सरकार तर्फे द्योगधंद्यासाठी भांडवल पुरवलं जातं. अशा स्वपरुपाच्या योजना येतात खऱ्या पण त्या किती लोकांपर्यंत पोहोचतात,याचा खरा लाभ कोणाला मिळतो,सरकारी कार्यालयांमध्ये अशा योजनांच्या नावाखाली गरीब तरुणांना फसवून त्यांची दिशा भूल करून लुटणाऱ्या एजन्ट लोकांचा सुळसुळाट असतो,फक्त एजन्ट नाही तर त्या त्या खात्याचे संबंधीत अधिकारी,शिपाई,नोकरदार लोक त्यांची अदलं-मधलं  करण्याच्या पद्धती यासर्व गोष्टी लेकाने कथेमध्ये मांडल्या आहेत. सरकारी योजनांच्या मृगजळाचा प्रवास लेखकाने या कथेमध्ये मांडला आहे. सरकारी योजना,अनुदान हे एक प्रकारचे मुर्गजळच असतं ते कोणाला मिळत कोणाला मिळत नाही, त्यासाठी संपूर्ण आयुष्य तिष्ठत बसावे लागते.

पुस्तकाच्या शेवटची कथा 'श्रीलिपी' ही आहे. या कथेमध्ये एका शिक्षकाचा तरुण मुलगा व्यवसाय करू इच्छित आहे. पण शिक्षक बाप जुन्या विचारांचा म्हणजे नोकरी व्यवसायावर विश्वास ठेवणारा आहे. धंद्यामधील उतार चढाव त्याला माहिती आहेत. त्या उताराला तो घाबरत आहे त्यामुळे आपल्या मुलाने एखादी नोकरी करावी अशी इच्छा असणारा आहे. कथेमध्ये मांडलेला काळ हा संगणक क्रांतीच्या युगाचा आहे. MSCIT  या कोर्स द्वारे संगणकाच्या युगामध्ये स्वतःला सिद्ध करणारा काळ. यासर्व गोष्टी लेखकाने या कथेमध्ये उत्तम प्रकारे मांडल्या आहेत ज्यामुळे कथा वाचनीय झाली आहे.

श्रीलिपी या कथा संग्रहामधील सर्व कथा या २००२-२००८ या वर्षातल्या आहेत. त्यावेळच्या सर्व गोष्टींचा,सर्व परिस्थितीचा,आजूबाजूच्या वातावरणाचे तपशीलवार वर्णन लेखक किरण गुरव यांनी त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये केले आहे. तपशीलवार वर्णन,कथेच्या विषयाची निवड यामुळे या कथा भन्नाट आणि आशय संपन्न झाल्या आहेत. एकविसाव्या शतकातील,गतिमान आणि प्रगतीची कास धरणाऱ्या शतकातील प्रश्नांना,समस्यांना थेट भिडणाऱ्या कथा,लेखक किरण गुरव यांच्या 'श्रीलिपी' या कथासंग्रहामध्ये वाचायला मिळतात. पुस्तकाचे प्रकाशन 'शब्द पब्लिकेशन' यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि पुस्तकातील रेखाटने ज्यामुळे प्रत्येक कथेचा आशय आणि प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो ते साकारले आहे जितेंद्र पतके यांनी. प्रत्येकाने वाचावा असा हा कथा संग्रह लेखक किरण गुरव लिखित 'श्रीलिपी'