Sunday, July 3, 2022

राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण.....?

 



सिंहासन

                                                    लेखक - अरुण साधू.

 

स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न जेव्हा निर्माण होतो, तेव्हा स्पर्धा सुरु होते ती सत्ता मिळवण्याची. मिळालेली सत्ता टिकवून ठेवण्याचे जेव्हा आव्हान निर्माण होते तेव्हा सुरु होतो संघर्ष. जे शक्तिशाली असतात ते दुर्बलांवर मात करून सत्ता मिळवतात. जे मुसद्दी असतात ते शत्रूला गाफील ठेवून सत्तेत येतात कोणताही संघर्ष न करता. असे हे सत्तांतर प्राण्यांच्या जंगलामध्ये सुद्धा असते आणि माणसांच्या जंगलामध्ये सुद्धा. आता सत्तांतराचा खेळ आला म्हणजे राजकारण आलं, डावपेच आले,चढाओढ आली.याच सत्तांतराचा खेळ लेखकानी अचूक टिपून त्याला कादंबरीचे रूप दिले. मी बोलत आहे, लेखक अरुण साधू लिखित सिंहासन या कादंबरी विषयी.

 ३५२ पानांचे हे पुस्तक १९७७ साली प्रकाशीत झाले. पुस्तकाच्या कथेचा काळ जुना आहे पण कथेचा आशय हा आजच्या आणि किंबहुना येणाऱ्या काळाचा आहे. कथेची सुरुवात होतेती अर्थमंत्री श्री. दाभाडे यांच्या राजीनामा नाट्यापासून. इथून सुरु होतो सत्तांतराचा खेळ, ज्यामध्ये सी.एम समोर आव्हान उभं राहतं ते सत्ता टिकवून ठेवण्याचे. सत्तांतरच्या या खेळामध्ये दोन गट पडले जातात, ज्यामध्ये प्रत्येकाला अपेक्षा असते ती खुर्चीची, पदाची. जो तो स्वतःला सुरक्षित ठेवत ज्या गटामध्ये स्वतःचा फायदा आहे त्याच गटामध्ये सहभागी होतो. जस जशी पुस्तकाची कथा पुढे जाऊ लागते तस तशी एक उत्कंठता लागू राहते कि सरते शेवटी सत्ताधीश कोण होणार..? सिंहासन कोणाला मिळणार .....? या राजीनाम्याच्या माध्यमातून राज्याचं नेतृत्व आपल्याकडे यावे आणि सिंहासन आपल्याला मिळावे यासाठी दाभाडेंनी मुख्यमंत्रींना शह देण्याचा प्रत्यन केला, तो प्रयत्न कितपत यशस्वी होतो हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे

या पुस्तकाच्या कथेमध्ये खूप व्यक्तीरेखा आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखेची स्वतःची एक कथा आहे. ज्यामुळे पुस्तकाची मुख्य कथा खूपच भन्नाट झाली आहे. कथेमधील मुख्य व्यक्तिरेखा म्हणजे पत्रकार दिगू टिपणीस. दिगूला महाराष्ट्रातील आणि किंबहुना दिल्लीतल्या राजकारणाची, नेत्याची आणि प्रत्येक घडामोडींची इतंभूत माहिती असते. त्याचे अंदाज इतके अचूक असतात कि समोरचा थक्क होऊन जातो. तारुण्य देश स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये घालवलेल्या दिगूला तेव्हाच राजकारण म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, स्वार्थत्याग हे वाटत होतं आणि आताच राजकारण म्हणजे सत्ता! फक्त सत्ता हेच आहे. पुस्तकामध्ये राजकारणाच्या विश्लेषणासोबत विधीमंडळाच्या कामकाजाची पद्धत,मंत्र्यांच्या सचिवांचे काम यावर सुद्धा भाष्य केले आहे. या पुस्तकाच्या कथेवर आधारीत सिंहासन हा चित्रपट १९७९ रोजी प्रदर्शित झाला होता.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप बदल झाले. विलक्षण सत्तांतर झाले. एकाच घरात दोन गट पडले ते फक्त आणि फक्त सत्तेसाठी. आता हि सत्ता कशी आली कोणी आणली यावर बोलावं तेवढं कमी आज आणि आपला तो विषय नाही. सत्ता बदल झाले, पण आश्चर्य या गोष्टीचे वाटते कि १९७७ साली प्रकाशीत झालेल्या या पुस्तकाची कथा आजच्या काळातील राजकीय घडामोडींशी समरूप आहेत. सत्तांतराचा खेळ तसाच चालू राहणार हे या पुस्तकावरून समजून येते.

पुस्तकाचे प्रकाशन ग्रंथाली प्रकाशन यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ मीलन मुखर्जी यांनी आणि पुस्तकातील रेखाटने वसंत सरवटे यांनी साकारले आहे. प्रत्येक वाचकाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक लेखक अरुण साधू लिखित सिंहासन !


जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर संपर्क करा - Instagram ID - Shri_pustakexpress 


आमच्या YouTube चॅनेलला आजच भेट द्या

https://youtu.be/5VIjOdHZY1w