अधर्मयुध्द
लेखक- गिरीश कुबेर.
आजकाल धर्माच्या नावावर लोकांना
भडकावणे सहज सोपे झाले आहे. 'धर्म ही अफूची गोळी आहे.', मार्क्सचं हे वचन सिद्ध करते. धर्म या गोष्टीचा फायदा नेहमी तीच लोकं
घेतात ज्यांच्या पोटाची ददात मिटलेली असते आणि त्यांना सत्ता खुणावत असते.
धर्म नावाची ही अफूची गोळी गरीब आणि
अशिक्षित जनतेला सहज दिली जाते. या खेळामध्ये तरुण मंडळींना ओढून त्यांच्या
कच्च्या मेंदूला धर्माचा मुलामा लावून आपल्याला हवा तो आकार देता येतो. आणि मग
सुरु होतो धर्माच्या नावाचा रक्तरंजित प्रवास. पण धर्माच्या नावावर सत्ता
मिळवणाऱ्यांना हे माहित नसतं की धर्माच्या नावाने सत्ता मिळवता आली तरी ती
टिकवण्यासाठी धर्म पुरेसा नसतो.
नमस्कार मंडळी, धर्म आणि धर्माच्या नावावर केलेले
राजकारण आणि त्यांची जिहादची भाषा ऐकून धर्माबद्दलचे भलेबुरे गैरसमज पसरवले जातात.
पण त्यांच्या धर्मांधतेचा फायदा घेऊन
स्वतःची पोळी भाजून घेणारे नेहमी पडद्याच्या मागेच राहिले आहेत.
आज एका अशा पुस्तकाविषयी मी तुम्हाला
सांगणार आहे, जे तुम्हाला या सगळ्या विषयांची सखोल
आणि अभ्यापूर्वक माहिती देईल. मी बोलत आहे लेखक गिरीश कुबेर लिखित 'अधर्मयुध्द' या पुस्तकाबद्दल.
२४५ पानांच्या या पुस्तकामध्ये इस्लामी
दहशतवादी संघटनांचा उगम कुठून आणि कसा झाला. त्या सोबत त्याचे उद्देश काय होते नि
त्यांना खत पाणी घालून वाढवणारे कोण होते याविषयी अत्यंत सखोल विश्लेषणात्मक
माहिती सुमारे १५ प्रकरणातून मिळते. यासर्व घडामोडींचा इतिहास सुरु होतो विसाव्या
शतकापासून. एका अशा युगाची सुरुवात ज्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात
मानव उत्तुंग भरारी घेत होता. ते युग होतं, ऑटोमन साम्राज्याच्या उताराचं. इस्लामीक देशांमध्ये सापडणाऱ्या
तेलावर काही देशांचा डोळा होता. हे संपूर्ण तेल आपल्याला मिळावे आणि त्यासाठी
कोणत्याही थराला जाण्याची त्या देशांची तयारी होती. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, रशिया आणि यामध्ये सर्वात पुढे होती ती
महासत्ता अमेरिका. स्वतःच्या फायद्यासाठी अमेरिकेने कोणत्या प्रकारचे राजकारण करून
इस्लामीक देशातील धर्मांध माथेफिरूंना हाताशी धरून त्यांच्या दहशतवादी संघटनांना
कशा प्रकारे खत-पाणी घालून वाढवले. पुढे हाच अमेरिकेचा डाव त्यांच्यावरच
९/११ च्या रूपाने कसा उलटला इथं पर्यंतची सखोल माहिती लेखक गिरीश कुबेर यांनी या
पुस्तकामध्ये मांडली आहे.
मुस्लिम ब्रदरहूड म्हणजेच कुविख्यात ब्रदरहूड, हमास, पँलेस्टिनी संघटना, अल कायदा, काही राजकारणी पक्ष जमाते इस्लामी या
संघटनांमधील नेत्याची माहिती आणि त्यांनी केलेल्या सर्व गोष्टी आणि त्यांना
वेळोवेळी मिळालेली आर्थिक मदत आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळते. फक्त
दहशतवाद आणि दहशतवादी संघटना यांच्या बद्दलच नाही तर त्याचे अर्थकारण, त्यांच्या इस्लामीक बँकांविषयही एक
स्वतंत्र प्रकरण 'बँकांचं ब्रदरहूड' यामध्ये वाचायला मिळतं.
इस्लामीक देशातील धर्मांध राजकारण आणि
त्याला असलेली काही देशांची मदत या व्यतिरिक्त पाकिस्तान आणि त्याची आयएसआय यांनी
कसं येडा बनून पेढा खाल्ला आहे. पेढा म्हणजे काय आणि तो कोणाकडून खाल्ला असेल हे
वाचकांना हे पुस्तक वाचल्यावर समजून येईल. सध्या महाराष्ट्र राज्य आणि देशामध्ये
गाजत असेलेल्या ड्रग्स, गांज्या, हेरॉईन सारख्या प्रकरणातील या अंमली पदार्थांचा उगम कुठून झाला आणि
त्याची उलाढाल किती करोडो डॉलर्स पर्यंत पोहोचली होती त्याबद्दल सुद्धा आपल्याला
या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं.
या आधी लेखक गिरीश कुबेर यांची पुस्तकं
वाचली आहेत. त्यामध्ये 'एका तेलियाने', 'युद्ध जीवांचे', 'हा तेल नावाचा इतिहास आहे', 'टाटायन' आणि आता हे पुस्तक अधर्मयुध्द. या सर्व
पुस्तकांमधून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे लेखकाचा जागतिक राजकारणातील सखोल
अभ्यास. प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी त्या
विषयासंदर्भांतील संदर्भ ग्रंथांची माहितीसुद्धा ते वाचकांच्या समोर ठेवतात.
प्रत्येक घटना आणि त्यामागचा इतिहास लेखक वाचकांसमोर असा मांडतात जणू ते एक equation मांडत आहेत. त्यामुळे वाचक त्याच्या
लिखाणाकडे ओढला जातो. आजच्या social media च्या जगामध्ये एखाद्या विषयावर स्वतःचे मत मांडायचे असेल तर योग्य
अभ्यास असावा लागतो हे लेखक गिरीश कुबेर यांच्या प्रत्येक पुस्तकांमधून आणि
त्यांनी लिहिलेल्या लेखनमालिकेतून दिसून येते. हे पुस्तक वाचते वेळी एक गोष्ट
लक्षात येते की २००९ मध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक,त्यानंतर सुमारे ११ वर्षात पुलाखालून
बरंच पाणी गेले असले तरी परिस्तिथी तिच आहे. अजून सुद्धा लोकांना जातीच्या, धर्माच्या नावावर भडकवले जाते आणि
पडद्यामागचे लोक आपला स्वार्थ साधून
घेतात.
पुस्तकाचे प्रकाशन 'राजहंस प्रकाशन' यांनी केले आहे. धर्मावर आधारलेलं हे
राजकारण आणि त्यामुळे उद्भवलेले अधर्मयुद्ध हे किती दाहक आहे याचे दर्शन घडवणारे
पुस्तकाचे मुखपृष्ठ कमल शेडगे यांनी केले आहे. प्रत्येक अभ्यासू वाचकाने वाचावे
आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक लेखक गिरीश कुबेर लिखित 'अधर्मयुद्ध'..