सय
लेखिका - सई परांजपे
आपल्या समाजामध्ये अशा काही असामान्य
व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहेत, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर, आपल्या अखंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांच्या क्षेत्रामध्ये अव्वल
स्थान मिळवलं आहे. त्यांचे हे व्यक्तिमत्व आपल्याला प्रभावित करतं, त्यांच्या जडण-घडणीच्या प्रवासातून
आपल्याला आपल्या जगण्याचा मार्ग मिळतो. अशाच काही प्रभावशाली व्यक्तींच्या
आत्मचरित्रांची मालिका आम्ही आमच्या 'पुस्तकएक्सप्रेस' या ब्लॉगवर घेऊन आलेलो आहोत, त्या मालिकेतील पुढील व्यक्ती म्हणजे मराठी रंगभूमी, आकाशवाणी, बालरंगभूमी, दूरदर्शन, सिनेमा या माध्यमांमध्ये उल्लेखनीय
कामगिरी करणाऱ्या आदरणीय सई परांजपे. त्यांचा कला प्रवास सांगणारे 'सय' हे पुस्तक घेऊन आज तुमच्या भेटीला आलो आहे.
४५७ पानांच्या या पुस्तकाद्वारे
लेखिकेने त्यांचा आजवरचा कला क्षेत्रामधील प्रवास वाचकाच्या समोर मांडला आहे.
सिनिअर रॅंग्लर, सुप्रसिद्ध गणिततज्ज्ञ डॉ. रघुनाथ
पुरूषोत्तम परांजपे यांच्या एकुलत्या एक मुलीची शकुंतला परांजपे यांची एकुलती एक
मुलगी सई यांना त्यांच्या जन्मापासूनच
वेगळेपण लाभलेलं आहे. त्यांचं कुटुंब पुण्यातील प्रतिष्ठित कुटुंब, त्यामुळे त्यांच्या वेगळेपणाकडे
लोकांच्या भुवया उंचावलेल्या असत. लेखिका आणि नाट्य आणि सिनेसृष्टीमध्ये काम
करणाऱ्या यांच्या आई शकुंतला परांजपे यांचा कल आपल्या एकुलत्या एक मुलीला बहुआयामी
बनवण्यावर केंद्रित असे. त्यामुळेच त्या त्यांच्याकडून वाचन, श्लोक पाठांतर, शब्दोच्चार, नाच या गोष्टी करून घेत, या सर्व गोष्टी लेखिकेला त्यांच्या
पुढच्या जीवनात उपयोगी ठरल्या. त्याची सुरुवात झाली आकाशवाणीमधून. सुरुवातीला
इंग्रजी बातम्या आणि मराठी निवेदक म्हणून त्यांनी सुरवात केली, आणि तिथून त्यांच्या कला प्रवासाला
सुरुवात झाली.
बालरंगभूमी, दूरदर्शन, चिल्ड्रन्स फिल्म, हिंदी आणि मराठी रंगभूमी आणि सिनेमा कलाक्षेत्रामध्ये
त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. पुस्तकाच्या सुरवातीला लेखिकेने त्यांचा हा प्रवास
त्यांना आठवेल तसा नमूद केला आहे,त्यामुळे घटना क्रम पुढे मागे होण्याची शक्यता आहे असे प्रांजळ मत
त्यांनी मांडले आहे. त्यांच्या या संपूर्ण कला प्रवासामध्ये त्यांना NSD, FTII, पॅरिस मधील नाट्य शिक्षणाचा मोलाचा
वाटा आहे. त्याबद्दल लेखिकेने सविस्तर लिखाण केले आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये
लेखिकेने त्यांच्या वडिलांसोबत आणि त्यांच्या कुटूंबीयांसोबतच्या दिवसांबद्दल
लिहिले आहे.
जर तुम्ही कला क्षेत्राशी म्हणजे नाट्य, सिनेमा या क्षेत्राशी संबंधित असाल तर
हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शक ठरेल, कारण सई परांजपे यांनी लिहिलेल्या, दिग्दर्शित केलेल्या नाटकांचा सुरुवाती पासूनचा प्रवास आणि त्यांनी
लिहिलेल्या, दिग्दर्शित केलेल्या सर्व
चित्रपटांविषयी इतंभूत माहिती मिळते. विशेष म्हणजे सिनेमा बनवते वेळी त्यांना आलेले
अनुभव आणि त्यांना भेटलेल्या लोकांनी त्यांना दिलेली वागणूक या सर्व गोष्टींमधून
शिकत त्यांनी त्यांच्या यशाचा मार्ग बनवला. आणि त्या मार्गावर त्यांना फक्त आणि
फक्त यश मिळत गेलं. म्हणून वर उल्लेख केल्याप्रमाणे जर तुम्ही कला क्षेत्राशी
निगडीत असाल तर हे सर्व तुम्हाला मार्गदर्शक म्हणून ठरेल. इतर वाचकांसाठी हे
पुस्तक आणि लेखिकेचा संपूर्ण प्रवास भारावून टाकणारा आहे. जन्मापासून वेगळेपणाचा
वरदहस्त लाभलेली मुलगी पुढे तिच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करते
हे सर्व वाचतेवेळी अभिमान निर्माण होतो.
पुस्तकाचे प्रकाशन 'राजहंस प्रकाशन' यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ
सुभाष अवचट यांनी साकारले आहे. पुस्तकांमधील छायाचित्रांमुळे लेखिकेचा आजवरचा प्रवास जवळून अनुभवता येतो. सिने क्षेत्रामध्ये
काम करणाऱ्या सर्वांनी आवर्जून वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे
हे पुस्तक लेखिका, अभिनेत्री, दिग्दर्शिका सई परांजपे लिखित 'सय माझा कलाप्रवास'.