तहान
लेखक - डॉ.सदानंद देशमुख
तहान,तृष्णा ही कशाचीही असू शकते.कोणाला पैश्याची,कोणाला सत्तेची,कोणाला राजकारणाची,कोणाला सुखी संसाराची तर कोणाला
आयुष्यात खूप मोठं होण्याची. ती तहान भागवण्यासाठी लोकं कोणत्या थराला जातील, किती आणि काय करतील याचा नेम नाही. पण खरी तहान ही पाण्याची. त्यासाठी जगातलं पुढचं महायुद्ध हे
पाण्यासाठीच होईल याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. मंडळी विचार करा,तुम्ही पाण्याशिवाय किती दिवस राहू शकता,शास्त्रज्ञांच्या मते खूप तर ३-४ दिवस
आणि विना अंघोळीचे किती दिवस राहू शकता....? या प्रश्नांची उत्तर तुम्ही स्वतःच
द्या आणि ती मिळतात का बघा.
या आधी लेखक सदानंद देशमुख यांनी लिहिलेली 'बारोमास' ही कादंबरी वाचली होती; तेव्हा लेखकाच्या लिखाणाविषयी खूप आकर्षण वाटलं. आकर्षण का, तर गावा-गावांमधील राजकारण,भांडणे,शेती जीवनाचे विदारक रूप,शेतकरी बांधवांची अवस्था,समस्या याविषयी सखोल भाष्य लेखक आपल्या लिखाणामध्ये करतात. त्याच
प्रमाणे आज लेखक सदानंद देशमुख यांनी लिखाणबद्ध केलेली 'तहान'ही कादंबरी आज मी तुमच्या
भेटीला घेऊन आलो आहे. ही कादंबरी आपल्याला एका अशा गावाकडे,एका अशा भागाकडे घेऊन जाते ज्याबद्दल आपण ऐकलं आहे पण नेहमी दुर्लक्ष करत
आलेलो आहोत.
२०५ पानाच्या या कादंबरीमध्ये लेखकाने
तृष्णा म्हणजेच तहान काय आणि कशाची असते हे सांगितलं आहे. या तहानेसाठी माणूस
कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो याची गोष्ट लेखकाने या कादंबरीमध्ये सांगितली आहे.
कथेचा नायक राघोजी शेवाळे आणि त्याचे
कुटुंब आणि मुरल्या-छबील्या हे त्याचे दोन बैल ज्यांच्यावर
त्याचं जीवापाड प्रेम आहे;
हे कथेच्या केंद्र स्थानी आहेत.
कथेमध्ये बाकीच्या व्यक्तिरेखा या कथेला पुढे चालना देण्यासाठी आहेत. तस बघितल तर लेखक
सदानंद देशमुख हे त्यांच्या प्रत्येक कथा-कादंबरीमधून गावाकडील
अशा प्रमुख प्रश्नांवर बोट ठेवतातज्या प्रश्नांकडे आणि समस्यांकडे शासनाने नेहमी दुर्लक्ष केले आहे.
कादंबरीमधील सारंगपूर या गावामधील पाणी टंचाई आणि त्यासोबतच त्याच्या बाजूच्या गावची, खामगावची विदारक कहाणीसुद्धा मांडलेली आहे. लेखकाचे विशेष कौतुक म्हणजे
भवतालच्या परिस्थितीचे केलेले वर्णन त्यामुळे प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर उभा
रहातो; त्यामुळे कादंबरीपूर्ण वाचल्याशिवाय हातातून खाली
ठेवावीशी वाटत नाही.
कथेचा नायक राघोजी त्याचा मुलगा बबन हा
आपल्या बैल जोडीच्या जीवावर गावात पाण्याचा धंदा करतो. सुरवातीला त्याला त्यामध्ये
खूप बरकत मिळते. गावामधील नोकरदार वर्ग
आणि हॉटेल विक्रेते त्याचे नेहमीचे ग्राहक. पाण्याच्या पैश्यामुळे बबन इतका हुरळून
जातो की काही महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पुढे जाऊन त्याच्या आणि राघोजी या दोघांच्या आयुष्यात असं काही वादळ निर्माण होते की त्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन उध्वस्त होते.
कादंबरीमध्ये राघोजी शेवाळे याला
पडणाऱ्या स्वप्नांचे वर्णन वाचून अंगावर काटा येतो, मन सुन्न होऊन जाते. पाणी टंचाईमुळे लोकांची होणारी अवस्था,त्यांची वणवण आणि पुस्तकांमध्ये खूप
असे प्रसंग आहेत ज्यामध्ये सार्वजनिक हापश्यावर पाण्यासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा आणि त्यात एक माणूस जिवाच्या आकांताने हाफशयाचा दांडा
जोरजोरात मारत असतो,हे वर्णन वाचून घशाला अक्षरशः कोरड
पडते. माणुसकीचा धर्म लोक पाण्यामुळे विसरून गेले आहेत; म्हणतात "एक वेळ जेवून जा पण
पाणी मागू नको" असे आणि कितीतरी विदारक परिस्थितीचे वर्णन या पुस्तकामध्ये
वाचायला मिळते.
जगामध्ये पुढचे महायुद्ध हे पाण्यासाठी
होईल असं म्हणतात ते काही खोटं नाही कारण जगामध्ये ७१ टक्के पाणी आणि २९ टक्के
जमीन आहे. पण ७१ टक्के पैकी ०.५% पाणी साठा हा पिण्याच्या पाण्याचा आहे आणि तो ही
सध्या कमी होत आहे. पृथ्वीच्या पोटात बोर मारून मारून आपण जमिनीच्या आतील
पाण्याच्या नसा कायमच्या कापत आहोत. त्यावर वाढणारी लोकसंख्या त्यामुळे भुईला भार होईल एवढी लोकसंख्या वाढल्यामुळे निसर्गावर
पडणाऱ्या भाराविषयीसुद्धा लेखकाने विशेष भाष्य केले आहे.
पुस्तकाचे प्रकाशन 'कॉन्टिनेन्टल प्रकाशन'यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ डॉ.गजानन जाधव यांनी साकारले
आहे. पुस्तकांमधील चित्रे गोपाळ वाकोडे,जगन राठोड,गजानन कुलकर्णी यांनी साकारली आहेत
त्यामुळे पुस्तकांमधील प्रत्येक प्रसंग जिवंत वाटतो आहे. प्रत्येकाने वाचावे असे
हे पुस्तक आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक लेखक डॉ.सदानंद देशमुख लिखित "तहान".