लोक माझे सांगाती
मा.
शरद पवार
आपल्या देशामध्ये,आपल्या राज्यामध्ये काही अशा असामान्य
व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहेत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर,आपल्या अखंड इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांच्या
क्षेत्रामध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे.
त्यांचे हे व्यक्तिमत्व आपल्याला प्रभावी करत,त्याच्या जडण-घडणीच्या प्रवासातून आपल्याला आपल्या जगण्याचा मार्ग
मिळतो. अशाच काही प्रभावशाली व्यक्तींच्या आत्मचरित्राची मालिका आम्ही आमच्या
पुस्तकएक्सप्रेस या ब्लॉगवर घेऊन येत आहोत.
या आत्मचरित्र मालिकेची सुरवात एका अशा
व्यक्ती पासून करावी जी त्यांच्या क्षेत्रामध्ये अव्वल आहे. त्यांचे ते सर्वोच्च
स्थान त्यांनी कायम ठेवले आहे. फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपुर्ण देशाच्या
आणि जगाच्या राजकारणातील नॉट आऊट खेळाडू म्हणजेच आदरणीय माजी केंद्रीय कृषी मंत्री, मा.शरद पवार साहेब. लोक माझे सांगाती
हे त्यांचं आत्मचरित्र सांगणारे पुस्तक मी आज तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे.
३५४ पानांचे हे पुस्तक शरद पवार
यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसनिमित्त प्रकाशित झाले होते आणि आज तब्बल पाच
वर्षांनी मी हे पुस्तक वाचले. कितीही वेळाने हे पुस्तक वाचले असले तरी शरद पवार यांचे
व्यक्तिमत्व कधीच जुनं होणार नाही. ते सदैव चिरतरुण राहणारे आहेत. पवार यांचं
राजकीय अस्तित्व (ऑरा) संपला आहे असं म्हणणारे आज घरी बसून आहेत हे आपल्या सर्वांना
माहिती आहे. जशी आपल्या महाराष्ट्राची
ओळख हि राखट देशा,कणखर देशा,दगडांच्या देशा अशी आहे तीच ओळख
पवारांच्या व्यक्तिमत्वाशी तंतोतंत जुळते हे या पुस्तकातून समजून येतं.या
पुस्तकामधून पवारांच्या जन्म पासून ते २०१५ पर्यंतचा राजकीय,सामाजिक प्रवास मांडला आहे.
शरद पवार यांच्या आई शारदाबाई यांचा
जन्म कोल्हापूरचा. सामाजिक न्यायाचा वसा घेऊन राज्यकारभार
करणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या संस्थानातला. वडील गोविंदराव आणि आई
शारदा बाई याना एकूण अकरा अपत्य. अकरा भावंडांच्या कुटुंबामधील शरद पवार हे आठवे
अपत्ये. एवढा मोठा परिवार असून सुद्धा आई शारदाबाई यांचे प्रत्येक मुलाकडे
विशेष लक्ष होते. शरद पवार आणि त्यांच्या आईचं नातं वेगळंच होतं. शरद पवार यांच्या
आई सलग चौदा वेळा लोकल बोर्डच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्या आहेत.
आईंकडे असणारे नेतृत्व गुण हे आपसूक
पणे शरद पवार यांच्या कडे आले आहेत. पवारांच्या घराचे वातावरण राजकीय-सामाजिक
जडणघडणीचे.पवारांचे शालेय शिक्षण बारामतीतील
एम.इ.एस इथे झाले पुढे महाविद्यालयीन
शिक्षण पुण्याच्या बी.एम.सी.सी महाविद्यालयामध्ये झाले आणि तिथून त्यांच्या
कार्यकर्ता जीवनाला सुरवात झाली. सुरवातीला काँग्रेस कार्यकर्ता मग पुढे पुणे शहर
युवक काँग्रेस सेक्रेटरी,
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
अध्यक्ष ते अखिल भारतीय काँग्रेस महासमिती हा त्यांचा काँग्रेस कार्यकर्ता
म्हणूनचा प्रवास. युनेस्कोच्या प्रॉमिसिंग युथ लिडर स्कॉलरशिप तर्फे एखाद्या राष्ट्रप्रमुख बरोबर
त्याच्या कार्यालयामध्ये काम करण्याची संधी मिळते. पवारांना हि स्कॉलरशिप मिळाली
होती. आणि तिथून त्यांच्या राजकारणी आयुष्याला सुरवात झाली.
आदरणीय यशवंराव चव्हाण साहेब यांनी
पवारांच्या राजकीय कारकिर्दी साठी पाठबळ दिले आणि १९६७
साली बारामती मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले आणि तिथून ते आज पर्यंत
विजयाची घोडदौड सुरूच आहे. तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,देशाचे संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री हे सर्व पद त्यांनी
अत्यंत योग्य रीतीने सांभाळली. यासोबतच आपत्ती व्यवस्थापन,क्रीडा,ऊद्योग,शिक्षण,कृषी यासर्व क्षेत्रामधील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. या
पुस्तकाबद्धल आणि पवारांविषयी बोलू आणि लिहू तेवढ
कमी आहे. म्हणून इथे थोड थांबतो.
काँग्रेस पक्षातून बाहेर पडून स्वतःच
राजकीय अस्तित्व निर्माण करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना
केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दहा
वाजून दहा मिनिटे वेळ दाखवणारे घड्याळ हे चिन्ह कसे झाले याची सुद्धा रंजक कथा मनाला स्पर्श करून जाते.
सामान्य कार्यकर्ता ते मंत्री आणि आता राजकारणातील अवलिया,अजिंक्य तारा,जादूगार असा भारावून टाकणारा पवारांचा
हा राजकीय प्रवास मनामध्ये घर करून राहतो.
२०१९ च्या निवडणुकी आधी आम्ही
तरुण पिढीने
पवारांच्या राजकारणातील गूढ कथा ऐकल्या
होत्या. परिस्थिती कोणतीही असो पवार त्यातून योग्य मार्ग काढतात हे ऐकलं होतं. पण
२०१९ च्या निवडणुकीत ती जादू,ते गूढ रहस्य अनुभवायला मिळाले. या एका कारणामुळे मी या पुस्तकाकडे
आकर्षित झालो. आदरणीय सुप्रियाताई सुळे
म्हणतात ते १००% खरं आहे शरद पवार हे राजकारणातील नॉट आऊट खेळाडू आहेत. पवारांना
लहान समजणारे आणि त्यांचं अस्तित्व संपलं आहे म्हणणारे आज घरी बसले आहेत. या
पुस्तक परिचयातून मी त्यांना हाच संदेश देईन कि एकदा हे आत्मचरित्र वाचा म्हणजे
तुम्हा तुमचं आत्मपरीक्षण होईल.
पुस्तकाचे प्रकाशन राजहंस प्रकाशन
यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ,अंतर्गत सजावट ऑरोबिंद पटेल,शेखर गोडबोले,राजू देशपांडे यांनी केले आहे. प्रत्येकाला
प्रभावित करणारे असे हे पुस्तक. प्रत्येक व्यक्तीने वाचावे नि प्रत्येक वाचकाच्या
संग्रही आवर्जून असावे असे हे पुस्तक लोक माझे सांगाती आदरणीय शरद पवार.