Friday, May 8, 2020

समाज्यामध्ये वावरणाऱ्या आणि स्वतःला नेते म्हणून घेणाऱ्या स्वार्थी नेत्यांच्या मेंदूला लागलेलं भिरूड कधी निघणार...?








भिरूड
                                   
                                   लेखक - गणेश आवटे



आपला भारत देश. विविध जाती-धर्म,रूढी-परंपरा,प्रदेश,भाषा या सर्वांनी नटलेलासमृद्ध देश.आपल्या देशामध्ये थोर विचारवंत होऊन गेले,ज्यांनी समाजामध्ये प्रबोधन केले. समाजाला विकासाची,उन्नतीची दिशा दाखवली.स्वातंत्र्यलढ्यापासून ते आत्तापर्यंत खूप विचारवंत झाले ज्यांनी आपल्या समाज बांधवांचे योग्य प्रबोधन करून समाजाला योग्य मार्गावर आणले. पण याच थोर विचारवंतांच्या शिकवणीचा काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी वापर केला आणि समाजमध्ये जातीय तेढ निर्माण केली. विकासाच्या मार्गावर असणाऱ्या समाजाला परत अधोगतीच्या काळदरीत ढकलून दिले. अशी कितीतरीउदाहरणं सद्यस्थितीतही आपल्या आजूबाजूला आहेत.....

नमस्कार मंडळी,आज तुमच्या भेटीला असेच एक पुस्तक घेऊन आलो आहे, ज्याने समाजामधील सत्य परिस्थितीवर भाष्य केले आहे. पुस्तकाचे नाव आहे 'भिरुड'. लेखक गणेश आवटे यांनी ग्रामीण जीवनामध्ये चालणाऱ्या जातीय राजकारणावर अत्यंत योग्य पद्धतीने आणि ज्वलंतभाष्य केले आहे. २५१ पानांच्या या पुस्तकाची कथा आपल्याला शहरी आणि ग्रामीण जीवनामधील फरक आणि त्यामधील राजकारण सांगते.

कथेचा नायक तुकाराम रामराव जगताप मराठवाड्यामधील करंडगावचा राहणारा शेतकरी कुटुंबात जन्मलेला तरुण.शिक्षणासोबतच शेतीकडेही त्याचे लक्ष.आपल्या कॉलेजमधली मित्रांसोबत तो 'शिवार साहित्य मंडळ' चालवतो,ज्यामध्ये विविध जातीचे त्याचे मित्र एकत्रित येऊन कथा,कविता करतात आणि त्यावर चर्चासुद्धा करतात.दलित चळवळीमध्ये भाग घेऊन दलितांच्या हक्कासाठी लढाही देतात.कथेचा नायक तुकाराम याच्या अवतीभोवती या पुस्तकाची कथा घडत असते. यासोबतच कथेमध्ये अनेक व्यक्तिरेखा येत रहातात  आणि त्यासर्वांची मांडणी लेखकांनी उत्तम प्रकारे केली आहे.

मराठवाडा विद्यापीठामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारावा या आणि अशा  इतरकाही मागण्यांसाठी सर्व समाज संघटना एकत्र येतात. पण काही दलित नेते हे इतर मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून पुतळा उभारण्याच्या मागणीकडे जास्त लक्ष देतात.पुतळे म्हणजे जातीविषयीचा स्वाभिमान,अशी धारणा समाजामध्ये निर्माण करतात. पण दुसरीकडे काही नेते हे पुतळा उभारणीच्या विरोधात असतात. आणि त्यांच्या विरोधमागची कारणे वाचल्यावर लक्षात येते की,स्वतःला सामाजिक कार्यकर्ते आणि समाजाचे मोठे नेते म्हणविणाऱ्या या नेत्यांचे स्वार्थाचे राजकारण किती भयानक असते. पुतळ्यासंदर्भात दलित समाजाची सवर्णांच्या विरुद्ध आणि सवर्णांची दलितांविरुद्ध माथी भडकवली जातात. आणि मग पुढे जे काही घडत ते वाचून मन सुन्न होऊन जात. नेत्यांच्याएकमेकांच्या सूडाच्या राजकारणामध्ये सामान्य समाज कसा भरकटला जातो,याचे उत्तम उदाहरण म्हणजे या पुस्तकाची कथा.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दलित बांधवाना समाजामध्ये योग्य स्थान मिळावे,यासाठी खूप मोठा संघर्ष केला. त्यासोबतच त्यांनी दलित समाजाचे प्रबोधन केले. 'शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा'ही बाबासाहेबांची शिकवण. त्याप्रमाणे काही दलितबांधवांनी त्याचे अनुकरण केले,बाबासाहेबांप्रमाणे त्यांनी सुद्धा त्यांच्या समाजाचे प्रबोधन केले. परंतु काही शहरी दलित नेत्यांना ग्रामीण भागातील दलितांच्या समस्या समजल्याचनाहीत किंवा त्याकडे त्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. गावामधील दलित लोकांना गावातील सवर्णांच्या विरुद्धभडकावून स्वतः नामानिराळे झाले. खोट्या अट्रोसिटीच्या केसेस घालणे,दलितांना मिळालेल्या सवलती आणि त्याचा त्यांनी केलेला अयोग्य वापर,श्रीमंत दलित मुलगा शासकीय शिष्यवृत्ती उचलतो आणि दुसरीकडे दरिद्री सवर्णाच्या मुलाला परीक्षेच्या फीसाठी पैसे नसतात याचे विदारक दृश्य लेखकाने सविस्तररित्या मांडले आहे.

वतर्मान पत्र आणि पत्रकार हे नेहमी निः पक्षपाती असावेत, त्यांनी नेहमी समाजाच्या बाजूने असले पाहिजे. पण पत्रकार आणि वर्तमान पत्र चालवणारे स्वतःच्या फायद्यासाठी समाजामध्ये तेढ निर्माण करणारे कार्य करतात तेव्हा काय होते याकडे सुद्धा लेखकाने वाचकांचे लक्ष वेधले आहे. एकाच समाजामधील वेगवेगळ्या घटना, समाजामधील प्रवृत्ती यांची केलेली मांडणी वाचून लेखकाच्या विचारशक्तीचा आणि त्याच्याकडे असणाऱ्या सामाजिक दृष्टीचा प्रत्यय वाचकाला येतो.राजकीय,सामाजिक व्यवस्थांचं जातं आणि पिठाच्या गिरणीचे जातं यांचं केलेलं वर्णन मनला स्पर्श करते. व्येवस्थांचं जातं  माणसाचे आयुष्य चिरडून टाकते आणि निष्पाप लोकांच्या आयुष्यच पीठ करून टाकते.

पुस्तकातील भाषा मराठवाड्यातील आहे. त्यामुळे वाचनामध्ये रंजकता येते. पुस्तकाचे प्रकाशन'पॉप्युलर प्रकाशन' यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि पुस्तकांमधील चित्रे चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साकारली आहेत. प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक आहे. प्रत्येक वाचकाने वाचावे असे हे पुस्तक,लेखक गणेश आवटे लिखित भिरूड.



-         श्रीजीवन तोंदले

No comments:

Post a Comment

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.