Sunday, July 14, 2019

गटूळं, बोचकं -लेखक रवींद्र बागडे





                         -  लेखक रवींद्र बागडे

नमस्कार,

आज मी एक नाही तर दोन पुस्तक घेऊन आलॊ आहे. एकाच लेखकाची दोन पुस्तके. जरी भाग एक आणि भाग दोन अशी या पुस्तकांची विभागणी झाली असली तरी दोन्ही पुस्तकांची नावे वेगळी. पण लेखकाच्या आयुष्यला जोडलेली.

मंडळी "कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती"  असं म्हणतात, आणि तशीच कथा या पुस्तकांची आहे. अतिसामान्य पासुन ते सामान्य पर्यत असा लेखकाचा प्रवास या दोन्ही पुस्तकांमध्ये दिसुन येतो. लेखक रवींद्र बागडे लिखित  गटूळं आणि बोचकं ही ती दोन पुस्तके.

लेखक रवींद्र बागडे यांच्या संपुर्ण आत्मकथेतील पहिला भाग १९५५ ते १९६८ म्हणजेच त्यांच्या जन्मापासुन ते त्यांच्या लग्नापर्यंतचा भाग हा गटूळं या पुस्तकामध्ये आहे.कथेची सुरवात मुंबईतील गिरगावच्या बामन हॉल भाजीबाजारातुन होते. मुंबईमधील झोपडपट्टी भाग म्हणजेच फोर्स रोड,ढोर चाळ,कामाठीपुरा या भागातील. कामाठीपुरा या भागाची ओळख किशोर कुमार यांच्या "ये जीवन हैं" या गाण्यातुन खऱ्या अर्थाने होते. छोट्या छोट्या झोपड पट्ट्या आणि त्यामध्ये एकाच वेळी रहाणारी दोन ते तीन कुटुंब,दिवसभर काबाड कष्ट करून रात्री मिळेल ते आणि मिळेल तेवढे दोन घास पोटात ढकलुन जिन्या खाली नाहीतर फुटपात वर झोपणारी लोक. "हॉटेल में खान और  फुटपात पे सोना" अशी खरी ओळख.

बापाच्या जुगारी आणि दारूबाजीमुळे नारायणाचे सर्व कुटुंब भाजीबाजारातील एक बाकड्यावर येते. नारायणाची (रवींद्र बागडे) आई सावित्रीबाई भाजी विक्री करून १-३ पैसे कमवुन आपल्या सात मुलांची पोट भरण्याचा प्रयत्न करत असते. सतत दारू पिऊन आईला मारझोड करणारा बाप आणि आई-बापाची सततची भांडण,उपासमार,लहान सात भावंडं त्यातलं एक लहानपणीच मारून जाते या सगळ्याला वैतागलेला १०-११ वर्षाचा नाऱ्या (रवींद्र बागडे). नाऱ्या आपल्या आईला भाजी विक्रीमध्ये मदत करून आपले शिक्षण पुर्ण करतो. आपल्या कुटुंबाचे दारिद्रय दुर करण्यासाठी नारायणाची आई सावित्रीबाई जिद्दीने आपल्या ६ मुलांना मोठं करते त्यांचे शिक्षण पुर्ण करते.आईची ही झगडण्याची वृत्ती छोटा नारायण आपल्यामध्ये आत्मसात करतो,शिक्षण पुर्ण करून आयकर विभागात कारकुनाची नोकरी मिळवतो.कथेमध्ये काही असे प्रसंग सुद्धा अशे आहेत जे वाचतेवेळी मन हादरून जाते, कामाठीपुरामधील विदारक आणि दारिद्र्याने भरलेली सर्व परिस्थिती वाचकाच्या डोळ्यांसमोर उभी येते.
 गटूळं या कादंबरीची कथा १९६८ म्हणजेच रवींद्र बागडे यांच्या लग्नापर्यंत आहे, त्याच्या पुढचा भाग १९६८ ते २००२ रवींद्र बागडे यांच्या आईच्या मृत्यु पर्यंतची कथा ही बोचकं या कादंबरी मध्ये आहे. लग्नानंतर सुद्धा नारायणाच्या आयुष्यामध्ये संघर्ष थांबत नाही.

 नारायण आपल्या सोबत आपल्या भावांचे सुद्धा आयुष्य मार्गी लागावे म्हणुन प्रयत्न करतो आणि त्यांना सुद्धा विविध ठिकाणी नोकरीला चिटकवतो. डॉ.बाबासाहेब आंबेटकर यांच्या "शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा" ही शिकवण आचरणामध्ये आणुन नारायण स्वतःच्या कुटुंबाचेच नाही तर आपल्या आजुबाजुच्या परिसराला सुद्धा या चळवळी द्वारे मार्गी लावतो. तो राहत असलेल्या धारावीच्या उत्कर्ष नगर मध्ये उत्कर्ष चाळ समिती स्थापन करून त्या वस्तीमध्ये विविध सुधारणा घडवून आणतो त्यासोबत अंधेरी,बोरिवली येथे विविध सुधारणा व समाजप्रबोधनाचे काम करतो. येथे नारायणाचा एक सामाज सुधारक म्हणुन प्रवास सुरु होतो. नारायणाला समाज सुधारक,लेखक,कवी म्हणुन खुप पुरस्कार व सन्मान मिळतात.

 पुढे सर्व भावंडांचा संसार मार्गी लावता नारायणाला खुप उपेक्षा सहंकाराव्या लागतात कधी सामाज्याकडुन तर कधी स्वतःच्या कुटुंबाकडून. कथेच्या शेवटी शेवटी नारायणाच्या मुलाच्या मृत्यु ने नारायण आणि त्याची पत्नी या दोघांचे आयुष्य असे काही उध्वस्त होते ते मार्गी येई पर्यंत नारायणाला होणाऱ्या यातना वाचतेवेळी वाचकाचे मन पिळवटून जाते.

दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन मेहता पब्लिकेशन यांनी केले आहे. पुस्तकांचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साकारले आहे. पुस्तकाची भाषा आणि शब्द रचना सहज समजण्या सारखी आणि सुटसुटीत आहे ज्याने वाचक कथेशी समरस होऊन जातो. गटूळं या कादंबरीच्या सुरवाती लेखकांनी त्यांच्या मुलासाठी लिहिलेलं पत्र हे वाचकाला खास कथेकडे ओढुन घेते. त्यासोबत दोन्ही पुस्तकांमधील काही काही प्रसंग वाचतेवेळी वाचक अक्षरशः हादरून जातो. नारायणाच्या म्हणजेच लेखक रवींद्र बागडे याच्या जन्मापासुन ते लग्नापर्यंतच्या आणि लग्नापासून ते त्यांच्या आईच्या मृत्युपर्यंतच्या जहरी अनुभव देणारे आत्मकथन.
 
गटूळं आणि बोचकं हे दोन्ही पुस्तके प्रत्येक वाचकाने जरूर वाचली पाहिजेल आणि प्रत्येकाच्या ती संग्रही आवर्जुन असली पाहिजेत.



www.Pustakexpress.com